सीजेपी आंदोलनादरम्यान पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून एक्सवरील अनेक अकाउंट्सना नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
delhi-police-issues-notices-to-x-accounts-over-offensive-posts-against-pm-modi-student-protest

दिल्लीसह इतर ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुरक्षा दलांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरून करण्यात आलेल्या पोस्टप्रकरणी दिल्ली पोलिसांनी काही वृत्तसंस्थांच्या सोशल मीडिया अकाउंटसह एक्सवरील अनेक अकाउंटना नोटिसा बजावल्या आहेत.

एनडीटीव्हीने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसार, पोस्टमध्ये आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या व्यक्तींची माहिती देण्याची मागणी करत दिल्ली पोलिसांनी संबंधित एक्स अकाउंटना नोटिसा पाठवल्या आहेत.

नेमक्या किती एक्स अकाउंटना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आंदोलनादरम्यान आणि त्यानंतर सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या मजकुराचा आढावा घेतल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कायद्याचे उल्लंघन झाले आहे का आणि अशा मजकुराचा सार्वजनिक सुव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो, याचा विचार करून पोलीस अधिकाऱ्यांनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्ट, व्हिडीओ आणि प्रतिक्रिया यांची छाननी केली.

यापूर्वी दिल्ली पोलिसांनी सांगितले होते की, आंदोलनासंदर्भात खोटे कथानक, अफवा आणि डीपफेक व्हिडीओ पसरविणाऱ्या पाकिस्तानशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या ४०० हून अधिक सोशल मीडिया हँडल्सची ओळख पटविण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आदेश देत, जंतरमंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान आणि २० जुलैच्या ‘संसद चलो’ मोर्चाशी संबंधित हिंसाचाराच्या वेळी अपलोड करण्यात आलेल्या पंतप्रधानांविरोधातील आक्षेपार्ह आणि शिवीगाळ असलेल्या पोस्ट व व्हिडीओ हटविण्याचे निर्देश दिले होते.

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनादरम्यान आणि त्यानंतर राजधानीतील हिंसाचाराच्या काळात विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह आणि शिवीगाळ करणाऱ्या अनेक पोस्ट समोर आल्या होत्या.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांचे सोशल मीडिया निरीक्षण पथक अशा प्रकारच्या मजकुराची ओळख पटविण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. आक्षेपार्ह मजकूर आढळल्यानंतर संबंधित सोशल मीडिया इंटरमिडियरीना नोटिसा पाठवून तो मजकूर हटविण्याचे निर्देश दिले जात आहेत, असे या वृत्तात म्हटले आहे.

पंतप्रधानांविरोधात शिवीगाळ करणाऱ्या अनेक अश्लील टिप्पणी आणि व्हिडीओ नोटिसांनंतर संबंधित प्लॅटफॉर्मवरून आधीच हटविण्यात आले आहेत, असेदेखील या वृत्तात सांगण्यात आले आहे.

ही मोहीम अद्याप सुरू असून, सायबर आणि सोशल मीडिया टीम आंदोलनाशी संबंधित ऑनलाइन घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आणखी आक्षेपार्ह पोस्ट शोधून काढणे आणि लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मजकुरावर योग्य ती कारवाई होईल, याची खात्री केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे.