Ajinkya Rahane Retirement – अजिंक्य रहाणेने ‘टायमिंग’ साधलं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा स्टार क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रहाणेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करत असल्याची माहिती दिली.

अजिंक्य रहाणे हिंदुस्थानकडून 85 कसोटी, 90 एक दिवसीय आणि 20 टी-20 सामने खेळला. तसेच आयपीएलमध्ये तो वेगवेगळ्या 6 फ्रेंचायझींकडून 212 सामने खेळला. कसोटीत त्याच्या नावावर 5077 धावांची नोंद असून यात 12 शतकांचा समावेश आहे. तर एक दिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 2962 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 3 शतकांचा समावेश आहे. 2021 मध्ये विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याने हिंदुस्थानच्या संघाचे नेतृत्व केले होते आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकून दिली होती.

निवृत्तीची घोषणा करताना काय म्हणाला रहाणे?

निवृत्तीची घोषणा करताना रहाणे म्हणाला की, आयुष्याचे वास्तव हेच आहे की प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते आणि प्रत्येक गोष्टीचा एक शेवट असतो. जेव्हा ती वेळ येते, तेव्हा आपल्याला तिचा आदर करून पुढे जावे लागते. मी माझ्या फलंदाजीमध्ये नेहमीच टायमिंगवर विश्वास ठेवला आहे आणि त्याचे महत्त्व नेहमीच समजलो आहे. आज मला असे वाटते की, हीच योग्य वेळ आहे पुढे जाण्याची आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करण्याची.

संघहिताला कायम प्राधान्य दिले

तो पुढे म्हणाला, डोंबिवलीहून एक लहान मुलगा म्हणून फक्त सरावासाठी प्रवास करण्याच्या त्या सुरुवातीच्या दिवसांपासून मी या खेळाला माझ्याजवळ असणारे सर्व काही दिले. दररोज, प्रत्येक डावात आणि फलंदाजीची संधी मिळालेल्या प्रत्येक वेळी हिंदुस्थानची कॅप परिधान करणे हेच माझे एकमेव स्वप्न होते. नेहमी माझ्या देशाचा आणि माझ्या संघाचा विचार स्वतःच्या आधी केला. मी हा खेळ पूर्ण प्रामाणिकपणे खेळलो आणि माझा नेहमीच विश्वास राहिला आहे की जर तुमचा हेतू प्रामाणिक असेल, तर हा खेळ नेहमीच तुमची काळजी घेतो.

क्रिकेटपटू म्हणून अध्याय संपत असला तरी…

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून हिंदुस्थान क्रिकेटचा खूप मोठा विकास झाला आहे आणि गेल्या 20 वर्षांत याचा एक भाग असल्याचा मला अत्यंत सार्थ अभिमान आहे. क्रिकेटपटू म्हणून माझा अध्याय जरी इथे संपत असला, तरी या खेळासोबतचा माझा प्रवास संपत नाही. या खेळाने मला जे काही शिकवले ते मूल्य शेअर करून पुढील पिढीला मदत करण्यासाठी आणि ज्या खेळाने मला सर्व काही दिले, त्या खेळाला काहीतरी परत देण्यासाठी मी उत्सुक आहे, असेही रहाणे म्हणाला.

बीसीसीआय, एमसीए, सहकारी आणि चाहत्यांचे आभार

मुंबईत एक नवोदित खेळाडू म्हणून सुरुवात करण्यापासून हिंदुस्थानसाठी खेळण्यापर्यंतचा हा प्रवास एक खूप मोठा सन्मान होता. या प्रवासात अनेक विजय आणि पराभव झाले, पण क्रिकेट खेळण्याचा आनंद, विविध संघांचा भाग असणे आणि आयुष्यभराच्या आठवणी तयार करणे हेच माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठे समाधान आहे. BCCI, MCA, माझे सहकारी खेळाडू, माझे प्रशिक्षक, प्रत्येक आयपीएल फ्रेंचायझी, राधिका, माझे संपूर्ण कुटुंब, माझे मित्र आणि मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे खूप खूप आभार. आणि सर्व क्रिकेट चाहत्यांचे विशेष आभार, ज्यांनी माझ्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट काळात मला साथ दिली, असेही तो पुढे म्हणाला.

तुम्ही मला कधीही परकं मानलं नाही!

अजिंक्य म्हणजे जो अजेय असा आहे, परंतु क्रिकेटने मला अनेकदा पराभव दाखवला. एक क्रिकेटपटू म्हणून, आपण यशस्वी होण्यापेक्षा अपयशी जास्त वेळा होतो. माझ्या संघाने सामने गमावले, माझ्याकडून चुका झाल्या, पण एक अशी जागा होती जिथे मी कधीच पराभूत झालो नाही… आणि ती जागा म्हणजे तुमची मनं! तुम्ही मला कधीही परकं मानलं नाही. तुमच्या प्रेमाबद्दल, विश्वासाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! कॅप नंबर 278, साइनिंग ऑफ, असेही रहाणे भावूक होत म्हणाला.