“आपण ड्रेसिंग रूममध्ये…”, मध्यरात्री 1 वाजता मराठमोळ्या रहाणेसाठी रोहित शर्माची भावुक पोस्ट, कोहलीही झाला व्यक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने गुरुवारी क्रिकेटला रामराम ठोकला. सोशल मीडियावर एक भावुक व्हिडीओ शेअर करत अजिंक्य रहाणे याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर टीम इंडियाच्या आजी-माजी खेळाडूंनी त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आता हिंदुस्थानचा माजी कर्णधार आणि मुंबई संघातील बॅटिंग पार्टनर रोहित शर्मा यानेही एक पोस्ट लिहून रहाणेच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली आहे. मध्यरात्री एक वाजता रोहितने आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच रनमशीन विराट कोहली यानेही एक्सवर एक पोस्ट शेअर करत रहाणेच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली आहे.

“आपण अनेक वर्षे एकाच ड्रेसिंग रूममध्ये एकत्र वेळ घालवला आहे. तुझ्या प्रत्येक यशामागील कठोर परिश्रमांचा मी साक्षीदार आहे. तुझ्या समर्पणाने, मेहनतीने आणि व्यावसायिक दृष्टिकोनामुळे तू नेहमीच इतरांपेक्षा वेगळा ठरलास. तुझ्या शानदार कारकिर्दीसाठी मनःपूर्वक अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी तुला आणि तुझ्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा”, अशी पोस्ट रोहित शर्माने केली आहे. या पोस्टसोबत त्याने रहाणेला मिठी मारतानाचा फोटोही शेअर केला आहे.

“स्लिपमधील सर्वात सुरक्षित हात आणि…”

“अजिंक्य तुझ्या शानदार कारकिर्दीबद्दल तुझे अभिनंदन, मित्रा. हिंदुस्थानच्या क्रिकेटसाठी तू मोलाचे योगदान दिले आहेस आणि तुझ्या या प्रवासाबद्दल तुला नक्कीच अभिमान वाटू शकतो. स्लिपमधील सर्वात सुरक्षित हात आणि कसोटी क्रिकेटमधील माझा आवडता फलंदाजीचा जोडीदार! तुला सदैव शुभेच्छा. ईश्वर तुला उदंड यश आणि सुख-समृद्धी देवो”, अशी पोस्ट विराट कोहली याने केली आहे.

दरम्यान, 38 वर्षीय रहाणेने 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी-20 सामने खेळले. या कालावधीत त्याने एकूण 8,414 आंतरराष्ट्रीय धावा आणि 15 शतके झळकवली. कसोटीत 5,077 धावा आणि 12 शतके, वन डेत 2,962 धावा व तीन शतके, तर टी-20मध्ये 375 धावा अशी त्याची कामगिरी राहिली.

Ajinkya Rahane -अजिंक्य योद्धा ते शापित गंधर्व