
जोगेश्वरीत राहणारा स्वमग्न असलेला मोहम्मद शहबाज हा अचानक घरातून बाहेर पडला आणि रस्ता चुकला. असह्य असल्याने तो सुभाष मार्गावर एका चहाच्या टपरी समोर रडत उभा राहिला. येणारे जाणारे त्याला बघत होते, परंतु कोणी मदतीचा हात देत नव्हते. त्याचवेळी गस्तीवर असलेले जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे अंमलदार जगन्नाथ मिसाळ यांची नजर त्याच्यावर पडली. मिसाळ यांनी त्याची विचारपूस करण्यास सुरुवात केली. पण आब्बा आणि अम्मी याशिवाय त्याला काहीच सांगता येत नव्हते. त्याने पालिकेच्या एका हिंदी शाळेचे टि-शर्ट घातलेले होते. मिसाळ यांनी तत्काळ संबंधित शाळेत संपर्क साधला. शिक्षक लक्ष कुमार नंदेश्वर यांनी मुलगा सध्या त्या शाळेत शिक्षण घेत नसला तरी प्रवेशावेळी देण्यात आलेला टी-शर्ट असल्याची माहिती दिली. त्यावरून त्याच्या कुटुंबीयांचा पत्ता शोधून मिसाळ यांनी त्याला सुखरूप घरी पोहोचवले.
व्यावसायिकाला धमकी; पोलिसांकडून गुन्हा दाखल
सराफाला धमकावणे आणि मारहाण केल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. कर्जाची रक्कम परतफेड करण्यावरून हा वाद झाल्याचे तपासात समोर आले आहे. अंधेरी येथे राहणारे तक्रारदार यांनी चार महिन्यांपूर्वी त्याने एकाला 35 लाख रुपये फ्रेंड लोनच्या माध्यमातून दिले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना एका व्यक्तीने फोनवरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचे नेमके काय म्हणणे आहे हे समजून घेण्यासाठी तक्रारदार हे वांद्रे येथे गेले. रात्री साडेबाराच्या सुमारास तक्रारदार हे वांद्रे पश्चिम येथे आले. तेव्हा एक जण दारू प्यायला होता. तक्रारदार यांना पाहताच दोघांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचदरम्यान पोलिसांची गाडी आली. पोलिसाने एका आरोपीला गाडी पुढे घेण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे गाडीत बसले. गाडी माहीमच्या दिशेने गेली. तेथे गेल्यावर तक्रारदार यांना शिवीगाळ करून मारहाण केली. हा प्रकार गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आला. पोलिसांनी या प्रकरणी दोनजणांविरोधात गुन्हा नोंद केला.





























































