
अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून या वर्षी मुंबईतील 100 गणेशोत्सव मंडळांना एपूण तीन कोटींचे विमा कवच दिले जाणार आहे. मंडळ पुढील वर्षी सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग सकपाळ यांच्या जयंतीनिमित्त बिर्ला ग्रुपच्या सहाय्याने गणेशोत्सव मंडळांसाठी हा स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पाच दशकांची यशस्वी वाटचाल करणारे अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्षभर रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, शैक्षणिक मदत, दुष्काळग्रस्त व पूरग्रस्त विभागातील नागरिकांना मदतीचा हात यासारखे विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. या वर्षी उत्सवाचा डामडौल न करता सामाजिक व इतर मंडळांना उपयुक्त ठरणारे उपक्रम राबवण्याचा संकल्प सोडला आहे.
या गोष्टींसाठी देणार विमा
सार्वजनिक गणेशोत्सव अधिक सुरक्षित व्हावा आणि लहानमोठय़ा मंडळांना आर्थिक संरक्षण मिळावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या विमा कवचामध्ये गणेशोत्सव कालावधीमध्ये मंडप व सजावटीचे संरक्षण, सुवर्ण अलंकार विमा, कार्यकर्त्यांसाठी अपघाती सुरक्षा यांचा समावेश आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवार 4 ऑगस्ट रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात येणार आहे. माधवबाग हॉल, सी.पी. टँक रोड. गुलालवाडी, भुलेश्वर येथे सायंकाळी 7 वाजता होणार आहे. या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त मंडळांनी घ्यावा, असे आवाहन मंडळाचे सचिव प्रथमेश पांडुरंग सकपाळ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्प मिलिंद झोरे – 7977318175, राहुल गायकर – 9324987599, स्वप्नील महाडिक – 8169051908, जुगल खेतलपार – 7738274469.




























































