वैभवच्या निवडीवर हर्षा भोगलेंची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुलीप ट्रॉफी 2026-27 स्पर्धेसाठी पूर्व विभागाच्या संघात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची उपकर्णधारपदी निवड झाल्यानंतर क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. या निवडीवर प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. वैभवला उपकर्णधार बनविण्यामागची भूमिका मला अद्याप समजलेली नाही. त्याची प्रतिभा निश्चितच असामान्य आहे, मात्र रेड-बॉल क्रिकेटमधील त्याचा प्रवास अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे, असे मत भोगले यांनी व्यक्त केले.

भोगले यांनी म्हटले की, वैभवने अल्पावधीत आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आक्रमक फलंदाजी आणि निर्भीड खेळामुळे त्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मात्र प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याचा अनुभव अद्याप मर्यादित आहे. आतापर्यंत वैभवने आठ प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात 207 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत दुलीप ट्रॉफीसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय धक्कादायक आहे.