
म्हणतात ना दैव बलवत्तर असले की, मृत्यूच्या दाढेतूनही लिलया सुटका होते. या उक्तीचा अनुभव वर्धा जिह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अक्षय माटे नावाच्या तरुणाला याची देही आला. गुरुवारी रात्री अल्लीपूर-टाकली मार्गावरील यशोदा नदीच्या पुरात तो वाहून गेला. पुराच्या प्रचंड वेगामुळे तो तब्बल 150 ते 200 मीटर अंतरापर्यंत वाहून गेला. मात्र प्रसंगावधान राखत त्याने एका मोठय़ा झाडाला घट्ट पकडले आणि त्यावर चढून स्वतःचे प्राण वाचवले.
घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक रात्रभर घटनास्थळी ठाण मांडून होते. अखेर, आज पहाटे 4 वाजताच्या सुमारास बचाव पथकाने अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी मोहीम राबवत या तरुणाला पुरातून सुखरूप बाहेर काढले. हे रेस्क्यू ऑपरेशन राबवताना मोबाईलचा मोठा आधार मिळाला.





























































