आसाममध्ये पुराचे संकट कायम, मृतांचा आकडा 82 वर; 1 लाख 92 हजार नागरिक अद्यापही बाधित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाममधील शिवसागर, गोलाघाट, जोरहाट, नागाव आणि चराईदेव जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम असून, राज्यातील 1 लाख 92 हजार लोकं अजूनही बाधित आहेत. दोन मृत्यूंमुळे मृतांचा आकडा 82 वर पोहोचला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली आणि एकूण पूरस्थितीत काहीशी सुधारणा होत असली, तरी मृतांची संख्या वाढताना दिसत आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ताज्या घटनेत एक मृत्यू शिवसागर जिल्ह्यातील नाझिरा महसूल मंडळात नोंदवला गेला,  दुसरा मृत्यू चराईदेव जिल्ह्यातील सोनारी येथे झाला. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, यावर्षी पुरामुळे झालेल्या एकूण मृतांचा आकडा 82 वर पोहोचला असून, सध्या कोणतीही व्यक्ती बेपत्ता असल्याची नोंद नाही. शिवसागर, गोलाघाट, जोरहाट, नागाव आणि चराईदेव या पाच जिल्ह्यांमधील 17 महसूल मंडळे आणि 379 गावांना सध्या पुराच्या पाण्याचा फटका बसत आहे.

राज्यातील 1 लाख 92 हजार (1.92) लोक अजूनही पूरग्रस्त आहेत. यामध्ये चराईदेव जिल्हा सर्वाधिक प्रभावित असून तिथे 77 हजार 456 नागरिक बाधित झाले आहेत, त्याखालोखाल शिवसागरमध्ये 63 हजार 492 आणि जोरहाटमध्ये 34 हजार 067 नागरिक बाधित आहेत. गुरुवारच्या तुलनेत परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली आहे, कारण गुरुवारी आठ जिल्ह्यांमधील दोन लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला होता. सध्या राज्यातील एकूण 54 मदत शिबिरांमध्ये 12 हजार 994 विस्थापित लोक आश्रयाला आहेत, तर 26 मदत वितरण केंद्रांमार्फत 5 हजार 384 लोकांना मदत पुरवली जात आहे.

एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांसारख्या विविध यंत्रणांच्या माध्यमातून बचाव आणि मदत कार्य वेगाने सुरू आहे. एएसडीएमएच्या अहवालानुसार, राज्यभरातील सुमारे 15 हजार 430 हेक्टर शेतजमीन अद्यापही पुराच्या पाण्याखाली असून, बाधित जिल्ह्यांमधील घरे, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.