
सांगलीत चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. जत तालुक्यातील करजगी येथे घडलेल्या या घटनेचा तपास करून पोलिसांनी अवघ्या 13 दिवसांत आरोपी पांडुरंग कळ्ळी (45) याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. दीड वर्षात जलदगती न्यायालयात या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यात आली.
जत तालुक्यातील करजगी गावात गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात ही दुर्दैवी घटना घडली. चार वर्षांची बालिका ही तिच्या चुलत बहिणीबरोबर खेळत असताना या दोघी आरोपी पांडुरंग कळ्ळी याच्या घरासमोरील झाडाखाली बदाम खाण्यासाठी गेल्या. तिच्यासोबत असलेल्या चुलत बहिणीला तिच्या आईने शाळेला जाण्यासाठी हाक मारली. त्यामुळे ती घराकडे गेली आणि पीडित बालिका एकटीच झाडाखाली होती. या संधीचा फायदा घेत आरोपी पांडुरंग कळ्ळी याने तिला घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी आरोपी पांडुरंग याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खून आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. ए. मोहंती यांनी या प्रकरणात पांडुरंग कळ्ळी याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी सरकारची बाजू मांडली.
पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पेटीत लपवला
पुरावा नष्ट करण्यासाठी बालिकेचा मृतदेह लोखंडी पेटीत लपवून ठेवला आणि आरोपी पांडुरंग कळ्ळी हा स्वतः गावकऱ्यांसोबत मुलीच्या शोधमोहिमेत सामील झाला होता. मात्र, त्याच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनी त्याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुह्याची कबुली दिली.





























































