
>> राजेश प्रधान
विघ्नहर्ता अशी ओळख असलेल्या गणपती बाप्पावरही यावर्षी महागाईचे विघ्न आले आहे. आखातातील युद्ध, महागाई आणि पुराचा तडाखा.. अशा तिहेरी संकटाचा गणपती कारखान्यांना फटका बसला आहे. वाढलेल्या इंधनामुळे वाहतुकीचे चढलेले दर.. कच्च्या मालाच्या भडकलेल्या किमती त्यातच पेणच्या कारखान्यांमध्ये घुसलेले पुराचे पाणी यामुळे प्रचंड नुकसान झाले असून मूर्तींच्या किमती २५ ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे बजेट कोलमडले असले तरी गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागताची आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे.
पेण हे गणेशमूर्ती निर्मितीचे देशातील सर्वात मोठे केंद्र मानले जाते. पेण शहर तसेच तालुक्यातील हमरापूर, तांबडशेत, जोहे, कळवे, उमरोली, सोनखार, सापोली या विभागात सुमारे ६०० गणेशमूर्ती कारखाने असून जवळपास निम्म्या कारखान्यांना पुराचा तडाखा बसला आहे. पाणी थेट कला केंद्रात घुसून कच्च्या मूर्ती, रंगवलेल्या एक ते दहा फुटांपर्यंतच्या मूर्ती भिजल्या आहेत. त्यामुळे नव्याने मूर्ती बनवण्याची वेळ कारखानदारांवर आली असल्याने खर्चाचा अतिरिक्त बोजा अंगावर पडला आहे. तसेच साचे, काथ्या, रबर, रंग, शाडू माती, पीओपी व इतर साहित्याचेही नुकसान झाल्याने दरवर्षी ३०० कोटींची उलाढाल असलेल्या गणपती कारखानदारांना यंदा पूर, युद्ध तसेच महागाई अशा तिहेरी संकटाने जवळपास कोट्यवधींचा फटका बसला आहे.
> “जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी जवळपास दीडशे कला केंद्रांमध्ये घुसले. याबाबत प्रशासनाने पंचनामे केले. इन्शुरन्स कंपन्यांनीदेखील पाहणी करून अहवाल तयार केले आहेत. परंतु आजतागायत आर्थिक मदत न मिळाल्याने गणपती कारखानदार आर्थिक अडचणीत आले आहेत.”
> — अभय म्हात्रे, प्रदेशाध्यक्ष गणेश मूर्तिकार संघटना
मूर्तीचे नुकसान, काम ठप्प
रायगड जिल्ह्यात पुरामुळे पेण शहरासह हमरापूर भागातील अनेक कार्यशाळांमध्ये पाणी शिरले. तयार मूर्तींचे नुकसान झाले तर अनेक ठिकाणी कामकाज काही दिवस ठप्प राहिले. त्यामुळे उत्पादनावरही परिणाम झाला असून अनेक मूर्तिकारांना आर्थिक फटका बसला आहे. दरवर्षी साधारण १० टक्क्यांपर्यंत दरवाढ होत असते; मात्र यंदा ती थेट २५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
वाढत्या इंधनाने गणित बिघडले
पेण येथे तयार होणाऱ्या मूर्ती महाराष्ट्रासह देशभर आणि अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, दुबई, सिंगापूर, मॉरिशस अशा अनेक देशांमध्ये निर्यात केल्या जातात. मात्र यंदा युद्धामुळे समुद्री वाहतुकीवर परिणाम झाल्याने निर्यात खर्च आणि कच्च्या मालाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. इंधनाचे दरही भडकल्याने यात अधिकच भर पडली आहे. पेण येथून मुंबई येथे ट्रकने गणेशमूर्ती घेऊन जाण्यासाठी मागच्या वर्षी पंधरा हजार रुपये खर्च येत होता. परंतु यंदा हा खर्च तीन हजार रुपयांनी वाढला आहे. याबरोबरच ४० किलोच्या शाडू मातीच्या बॅगेची किंमत १५० वरून आता १८० वर गेली आहे. रंग २० टक्क्यांनी वाढला आहे. कारागिरांची मजुरी पाचशे रुपयांवरून सातशेच्या घरात गेली आहे. त्यामुळे कारखानदारांचे गणितच बिघडले आहे, अशी माहिती बोरगाव येथील कारखानदार अविनाश भोईर यांनी दिली आहे.
























































