Chhatrapati Sambhaji Nagar – शहरातील दुचाकी चोरीचे सिंडीकेट चालवणाऱ्यासह चौघांना अटक; 11 लाखांच्या 28 दुचाकी जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती संभाजीनगर शहरातून दुचाकी चोरी करून त्या ग्रामीण भागातील ग्राहकांना विक्री करणारे सिंडीकेट सिडको पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी उजेडात आणले आहे. शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून लंपास केलेल्या ११ लाख २० हजार रुपयांच्या तब्बल २८ दुचाकी जप्त केल्या आहेत. या दुचाकी चोरीप्रकरणी चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

शहरात दरररोज जवळपास आठ ते दहा दुचाकी लंपास केल्या जात आहेत. या दुचाकी चोरीला आळा घालण्यासाठी स्थानिक पोलीस तसेच गुन्हे शाखा अपयशी ठरत आहे. दुचाकी चोरी थांबवा तसेच आपल्या हद्दीतील दुचाकी चोरीचे गुन्हे निकाली काढा, असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास हाती घेतला आहे.

सिडको पोलीस ठाण्यात संजय भगवान बडक यांच्या तक्रारीवरून दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सूरू असताना पोलिसांनी तब्बल ५० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. या तपासणीत संशयित योगेश कैलास गाडेकर (२७, रा. जाधववाडी, मूळगाव पीरबावडा, ता. फुलंब्री) हा दिसून आला होता. पोलिसांनी त्याच्या साथीदारांचा शोध घेऊन आरोपी कार्तिक गणेश पवार (१९), सौरभ दिलीप वाघचौरे (२६, दोघे, रा. धनगरवाडी, औराळा, ता. कन्नड) व राहूल कैलास बोरसे (२६, रा. शिरोडी, ता. कन्नड) यांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी २८ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या दुचाकी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाळूज, एमआयडीसी वाळूज, एमआयडीसी सिडको, चिकलठाणा, वेदांतनगरसह ग्रामीण भागातील देवगान रंगारी ठाण्याच्या हद्दीतून लंपास केल्या होत्या.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त रत्नाकर नवले, सहायक पोलीस आयुक्त मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर, अमोल जगताप, पोलीस हवालदार मंगेश पवार, पोलीस अंमलदार सहदेव साबळे, अमोल अंभोरे, प्रदीप फरकडे, अतुल सोळुंके यांच्या पथकाने केली.

चोरीच्या दुचाकी विक्रीची साखळी केली तयार

योगेश गाडेकर शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरी करत होता. या चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी त्याने नातेवाइकांच्या मदतीने साखळी तयार केली होती. त्यात राहुल बोरसे, कार्तिक पवार, सौरभ वाघचौरे हे सहभागी झाले होते. त्यांनी औराळा, चापानेर, कन्नड तालुक्यातील वेगवेगळ्या भागात अगदी स्वस्तात गाळ्या विक्री केल्या आहेत. त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येतील, अशी माहिती पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.