दिल्लीतील ‘जेन झी’ आंदोलनाची TIME मासिकाकडून दखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
time-magazine-covers-delhi-gen-z-cjp-protest-analyzes-pm-narendra-modi-12-year-tenure (1)

गेल्या महिन्यात दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेले ‘क्रॉक्रोच जनता पार्टी’चे(CJP) आंदोलन आणि त्यानंतर शिक्षणमंत्री असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांना द्यावा लागलेला राजीनामा याची जगभरातील विविध वृत्तपत्रांनी दखल घेतली आहे. तसेच प्रसिद्ध टाइम (TIME) मासिकाने देखील या आंदोलनाच्या निमित्ताने हिंदुस्थानचे पंतप्रधान यांची गेल्या १२ वर्षातील कारकीर्दीचा लेखाजोखा यामध्ये मांडला आहे. TIME मासिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या बारा वर्षांत देशातील राजकीय आणि प्रशासकीय संस्थांवर आपले प्रभावी वर्चस्व निर्माण केले, असा दावा या लेखात करण्यात आला आहे. विविध आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालांचा दाखला देत लेखकाने माध्यमे, निवडणूक यंत्रणा आणि इतर संस्थांवर सरकारचा प्रभाव वाढल्याने हिंदुस्थानातील लोकशाही कमकुवत झाल्याचे म्हटले आहे. मात्र, या सगळ्याला देशातील तरुणांच्या आंदोलनाने अनपेक्षित आव्हान दिले, असा त्याचा युक्तिवाद या लेखात करण्यात आला आहे. तसेच या आंदोलनाच्या काळात सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या ‘५६ इंच’च्या घोषणेचाही उल्लेख करण्यात आला आहे.

‘Revolt of the Cockroaches: How India’s Gen Z Humbled Modi’ या मथळ्याखालील लेखात म्हटले आहे आहे की, ‘या आंदोलनाची सुरुवात अभिजीत दिपके या हिंदुस्थाने विद्यार्थ्याने केली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी बेरोजगार तरुणांची तुलना ‘झुरळे’ आणि ‘परजीवी’ अशी केल्यानंतर दिपके यांनी उपरोधिक स्वरूपात ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) स्थापन केली. सोशल मीडियावर या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्याच काळात वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. परीक्षा रद्द होऊन पुन्हा घ्यावी लागल्याने अनेक विद्यार्थ्यांवर मानसिक ताण आला आणि काहींनी आत्महत्याही केल्याचे लेखात नमूद करण्यात आले आहे.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू झालेल्या आंदोलनाला सुरुवातीला मर्यादित प्रतिसाद मिळाला होता. मात्र, शिक्षणमंत्री यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केल्यानंतर परिस्थिती बदलली. पोलिसांनी त्यांना हटवल्यानंतर त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि हजारो तरुण आंदोलनात सहभागी झाले. पुढे संसदेकडे निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार, अश्रुधूर आणि पॅलेट गनचा वापर केल्याचा उल्लेख लेखात आहे. या कारवाईनंतर आंदोलन देशातील अनेक शहरांत पसरले आणि त्याला व्यापक जनसमर्थन मिळाले.

लेखकाच्या मते, या आंदोलनाने मोदी यांच्या नेतृत्वाभोवती उभारलेली प्रतिमा धुळीस मिळवली. आंदोलनकर्त्यांनी व्यंगचित्रे, घोषणा, सोशल मीडिया रील्स आणि उपरोधिक पोस्टर्सच्या माध्यमातून मोदींवर थेट टीका केली. ‘५६ इंची छाती’ अशा प्रचारातील प्रतिमेची खिल्ली उडवण्यात आली. भ्रष्ट व्यवस्थेविरोधातील लढवय्या अशी एकेकाळी उभी राहिलेली मोदींची प्रतिमा आता त्याच व्यवस्थेचे प्रतीक बनल्याची भावना अनेक तरुणांमध्ये निर्माण झाल्याचा दावा लेखात केला आहे.

 

या आंदोलनाच्या यशामागे सोशल मीडियाची मोठी भूमिका असल्याचे लेखक नमूद करतो. मुख्य प्रवाहातील माध्यमांकडे दुर्लक्ष करून तरुणांनी इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि इतर डिजिटल माध्यमांतून आपला आवाज देशभर पोहोचवला. बेरोजगारी, शिक्षणानंतरही दर्जेदार नोकऱ्यांचा अभाव, वाढता मानसिक ताण आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण यामुळे तरुणांमध्ये असंतोष वाढत गेला. लाखो पदवीधरांना रोजगार मिळत नसल्याने आणि कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करता येत नसल्याने त्यांच्यात निराशा निर्माण झाली आहे, असे लेखक म्हणतो.

लेखाच्या शेवटी लेखक स्पष्ट करतो की, या आंदोलनामुळे मोदी सरकार तातडीने सत्तेतून जाण्याची शक्यता नाही किंवा भाजपच्या निवडणुकांतील ताकदीवर लगेच परिणाम होईल असेही नाही. मात्र, बारा वर्षांच्या सत्तेनंतर मोदी यांच्या वैयक्तिक लोकप्रियतेच्या मर्यादा या आंदोलनामुळे स्पष्ट झाल्या असून, देशातील वाढत्या तरुण वर्गामध्ये त्यांच्या नेतृत्वाविषयी असंतोष उघडपणे समोर आल्याचे या लेखात प्रामुख्याने मांडण्यात आले आहे.