शौचास जाण्यास नकार दिल्याने डोक्यात लोखंडी रॉड घातला! चालकावर नगर परिषदेच्या अधिकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप, पत्नीला आमदारावर संशय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील सासाराम नगर परिषदेचे कार्यकारी अधिकारी विमल कुमार यांची रविवारी निर्घृण हत्या करण्यात आली आहे. रविवारी रात्री पाटण्याच्या दिशेने जात असताना विमल कुमार यांनी चालकाला शौचालयास जाण्यास नकार दिला. या वादातून चालकाला राग आला आणि त्याने अधिकाऱ्याची लोखंडी रॉडने हत्या केली. पोलीस तपासात चालकाने या हत्येची कबुली दिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. यावेळी चौकशीकरत असताना ड्रायव्हर मिथिलाश कुमार याच्या जबाबात विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. सुरुवातीला त्याने अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा बनाव रचला होता. मात्र, त्याच्या अंगावर कोणतीही दुखापत नसल्यामुळे आणि जबाबात सातत्याने बदल होत असल्याने पोलिसांनी चालकाची कसून चौकशी केली. यावेळी चालकाने हत्येची कबूली दिली.

सततच्या कामाचा ताण आणि लांब कामाच्या तासांमुळे आमच्यात नेहमी वाद होत असत, असे चालकाने पोलिसांना सांगितले. घटनेच्या दिवशीही त्यांच्यात वाद झाला होता. रात्रीच्या वेळी चालकाला शौचास थांबायचे होते. मात्र, अधिकाऱ्याने नकार दिल्याने राग अनावर होऊन त्याने गाडीतील लोखंडी रॉडने विमल कुमार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

हत्येनंतर आरोपीने हा प्रकार दरोडा किंवा अपघात असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला आणि नंतर सहकाऱ्याला फोन करून माहिती दिली. सध्या फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली असून हत्या करण्यासाठी वापरलेला लोखंडी रॉड शोधण्यासाठी पाण्याचा शोध घेतला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दुसरीकडे, मृताच्या पत्नीने डेहरीचे एलजेपी (राम विलास) आमदार राजीव रंजन सिंग उर्फ ​सोनू सिंग यांच्यावर 50 लाख आणि 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, आमदारांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत राजकीय षडयंत्र म्हटले असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.