मुद्दा – पंढरीचे पावित्र्य धोक्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुनील उंबरे

माती तृण कण जे दिसे
तेथे माझा विठोबा बैसे
नामा म्हणे सखा पांडुरंग…

श्री विठ्ठलाच्या दारातील दगड, माती असो की गवताची पाती, जे काही दिसेल तिथे माझा विठोबा बसल्याची भावना श्री संत नामदेवांनी आपल्या अभंगातून व्यक्त केलीय. पंढरीच्या पवित्र्याविषयी संताची सद्भावना आचरणात आणणारे बहुतांश आहेत. पण सार्वजनिक सभ्यता न पाळणाऱ्या नाठाळ भक्तांची विकृती पाहिल्यानंतर पंढरीच्या पावित्र्याशी आण्aिा स्वच्छतेशी त्यांना काही देणेघेणे नाही, असेच वाटते. वारकरी संप्रदायात चंद्रभागेच्या वाळवंटाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या वाळवंटात काही मंडळी उघडय़ावर नैसर्गिक विधी करीत असतील तर हे विठ्ठलभक्त कसले. हे तर ढोंगीच म्हणावे लागतील. वारीच्या निमित्ताने येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या नैसर्गिक विधीसाठी शासनाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था केली गेली होती. मात्र त्यांचा वापर होत नसेल तर या कृतीला जबाबदार कोण असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा वारकरी संप्रदायातील प्रचारक अन् प्रसारक मंडळी डोळ्यांसमोर येतात, कारण पंढरीत येणारा बहुतांश वारकरी हा महाराज मंडळींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दिंडी आणि पालखीतील सदस्य असतो. वारीच्या वाटेत कीर्तन, भजन, प्रवचन, कथा आदी धार्मिक कार्यक्रमावर भर असतो. या आध्यात्मिक प्रसारात पंढरीचे पावित्र्य, सार्वजनिक स्वच्छता आणि सभ्यता यावर अधिक भर दिला असता तर मन अस्वस्थ करणारे हे चित्र दिसले नसते. संताचे विचार मांडत असताना त्याचे आचरण कोणाकडून होत नसेल तर अशा बेशिस्त भक्तांना दिंडीतून हुसकावून लावण्याचे धाडसदेखील दिंडी चालकांनी दाखवायला हवे, तरच वारीचे अन् पंढरीचे पावित्र जपले जाईल.

पंढरपूरचे पावित्र्य आणि स्वच्छतेसाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविले जातात. त्यापैकीच एक ‘स्वच्छतेची दिंडी पंढरीच्या दारी’ हा उपक्रम आहे. हा उपक्रम प्रामाणिकपणे राबविला असता खऱ्या अर्थाने लोक जागृतीचे काम झाले असते आणि पंढरपूरचे पावित्र्य अन् आरोग्य सुदृढ राहिले असते. यंदाच्या आषाढीला तीस लाखांहून अधिक वारकरी येऊन गेले. या लाखो वारकऱ्यांच्या सेवा-सुविधांसाठी शासनाने हजारो स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली होती. बहुतांश वारकऱ्यांनी त्याचा वापर करून पंढरीचे पावित्र्य जपले. मात्र काहींना ते जपता आले नाही.

अशा कृतीमुळे केवळ भावनिक ठेच पोहचत नाही, तर पंढरपूरमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते हेही लक्षात घ्यायला हवे.