
तहलका मॅगझीनचे माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना 2013मधील बलात्काराच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दोषी ठरवत 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. तरुण तेजपाल यांनी दोन आठवडय़ांत शरण येण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
तहलका मॅगझीनमध्ये काम करणाऱया महिला पत्रकाराने तेजपाल यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणी मे 2021मध्ये गोव्याच्या सत्र न्यायालयाने पुराव्यांअभावी तेजपाल यांची निर्दोष सुटका केली होती. या निर्णयाला गोवा सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर न्या. नीला गोखले आणि न्या. अमित जामसांडेकर यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. न्यायालयाने 81 पानी निकाल सुनावताना सत्र न्यायालयाच्या निर्णयावर ताशेरे ओढले. सत्र न्यायालयाचा निर्णय तर्कसंगत नसल्याचे नमूद करत उच्च न्यायालयाने बचाव पक्षालाही खडे बोल सुनावले. तरुण तेजपाल यांना दोषी ठरवताना उच्च न्यायालयाने म्हटले की, सत्र न्यायालयाने पुराव्यांऐवजी पीडितेच्या व्यवहारावर जास्त लक्ष दिले.
























































