
महाराष्ट्रामध्ये आज सर्व गोष्टी या वरच्या आदेशाप्रमाणे हाताळल्या जात आहेत. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले. प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं आहे. महाराष्ट्रात कंत्राटदार जन्मालाच आले नाहीत का, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था, प्रशासनाची कार्यपद्धती आणि वृक्षतोडीवरून महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
नाशिकच्या दौऱयावर असलेल्या राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात सुरू असलेली कामे आणि येथील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून जोरदार टीका केली. नाशिकमध्ये याआधी झालेल्या कुंभमेळ्यातून पैसे काढणे, अर्थकारण हा उद्देश नसल्यामुळे खूपच चांगल्या पद्धतीने कामे झाली, पण आज शहरात संपूर्ण शहरात खड्डे पडले आहेत. वाहने खड्डय़ांमध्ये जाऊन लोकांचे जीव जात आहेत, पण या प्रशासनाला त्याचं काहीच सोयरसुतक पडलेलं नाही. फक्त कामातून आपलं कमिशन कसं मिळेल, हे बघत आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
आम्ही जी कामे केली होती, नाशिक सुंदर केलं होतं, त्याची दुर्दशा बघून वाईट वाटतं. मग, ते बॉटनिकल गार्डन असो की हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचं म्युझियम असो, यांसह अनेक गोष्टी त्या वेळेला केल्या. ही विकासकामे दुसऱयाने केली म्हणून त्या विकासाची वाट लावायची असं सर्व सुरू आहे. देशातल्या स्मार्ट सिटी कुठे गेल्या? असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले की, सगळी शहरं बरबाद होताना दिसतायेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटलांनी विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे
दगडांवरचे ठसे घेऊन आधारकार्ड चेक करण्यापेक्षा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या विद्यार्थ्यांकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे, असे राज ठाकरे यांनी सुनावले. ‘नीट’चे पेपर फुटले, अजूनही नीटचा पेपर फुटणार नाही ना? असे प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले, त्याचं मला वाईट वाटलं. या पेपरफुटीमुळे नाशिकमध्ये यश गोसावी या मुलाने आत्महत्या केली, त्याचे नाव आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये नाही. सरकारचं हे काय चालू आहे? असा सवालही केला.
जंतरमंतर ही फक्त सुरुवात
‘जंतरमंतर’वर विद्यार्थ्यांचे बऱयाच वर्षांनंतर असे आंदोलन झाले. त्यात फक्त ‘नीट’चे विद्यार्थी नव्हते, तर तो सभोवतालचा राग तिकडे बाहेर पडला. तो अजून जोरात जास्त पद्धतीने बाहेर येईल. ‘जंतरमंतर’वरील आंदोलन ही सुरुवात होती. हे आंदोलन घराघरांत शिरलं. तेथे तरुणांना मारहाण झाली, तेव्हा आपल्या मुलाला मारलं असं प्रत्येक आई-वडिलांना, आजी-आजोबांना वाटलं होतं.
राज्यभर केचिंग क्लास पॅटर्न
- दहावी पास झाल्यानंतर पहिल्यांदा क्लासमध्ये अॅडमिशन घ्यायचे आणि त्यानंतर तो क्लास सांगणार, विद्यार्थ्याने कोणत्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यायचे, हा पॅटर्न नाशिकप्रमाणे राज्यभर सुरू आहे.
- ही कुठली शिक्षण पद्धती आहे, असा सवाल त्यांनी केला. क्लासची फी 1 लाख 40 हजार आणि
कॉलेजची फी 20 हजार, यात दोघांचेही संगनमत आहे. - शिक्षणाची अशी भिकार परिस्थिती झाली असताना विद्यार्थ्यांनी चिडायचं नाही का?

































































