
धो धो पाऊस सुरू असतानाच खारघर आणि तळोजा परिसराला मात्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने या भागासाठी सिडकोच्या माध्यमातून दररोज २३० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण झाले असून हंडाभर पाण्यासाठी त्यांना वणवण भटकावे लागत आहे.
खारघर आणि तळोजा नोडमध्ये वाढती लोकसंख्या, नव्याने उभारल्या जाणाऱ्या गृहनिर्माण संकुलांमुळे पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे, मात्र उपलब्ध जलसाठा आणि वितरण क्षमतेत अपेक्षित वाढ न झाल्याने अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सिडकोकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
२३० टँकरने पुरवठा
तळोजा व खारघर परिसरात दररोज सुमारे २३० टँकरने पाणी पुरवले जात असून सर्वाधिक गरज तळोजा वसाहतीतील नव्या गृहनिर्माण प्रकल्पांना भासत आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असला तरी पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन जलस्रोत उपलब्ध करणे, जलवाहिन्यांचे जाळे मजबूत करणे, गळती रोखणे तसेच अतिरिक्त व्यवस्था करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.































































