
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी नाशिकमधील खड्ड्यांची पाहणी करणार आहेत. महापालिकेत शिवसेना नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती उपनेते दत्ता गायकवाड, महापालिका गटनेते केशव पोरजे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
शहरात खड्यांमुळे सहा जणांचा बळी गेला आहे, अनेक जखमी मृत्यूशी झुंज देत आहेत. सत्ताधारी आणि प्रशासनाकडून निव्वळ धूळफेक सुरू आहे. याची गंभीर दखल घेऊन आदित्य ठाकरे गुरुवारी नाशिकमध्ये येत आहेत. ते दुपारी अडीचच्या सुमारास शहरातील काही भागांत खड्यांची पाहणी करणार आहेत. यानंतर महापालिकेत गटनेते केशव पोरजे यांच्या कार्यालयात ते शिवसेना नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत.
कारवाई होत नसल्याने मोर्चा
खड्डे बुजविण्याचे काम त्वरित करा; हलगर्जीपणा, भ्रष्टाचार करून शहराची दुर्दशा करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी केली. मात्र कुठलीही कारवाई न करता संबंधित भ्रष्ट, दोषींना पाठीशी घातले जात आहे. एमएनजीएलवर ठपका ठेवून महापालिका जबाबदारी झटकत आहे.
नाशिककरांना दिलासा देण्यासाठी, सत्ताधारी व प्रशासनाला जाग आणण्यासाठी सोमवारी, १७ ऑगस्टला महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.
































































