सामना अग्रलेख – राष्ट्रीय कार्यकारिणी, खोटी आणि खरी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपची बरेच दिवस रखडलेली आणि आता जाहीर झालेली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणजे फार तेजस्वी किंवा शक्तिमान प्रकार नाही. मोदी-शहांना हवी तशी माणसे या कार्यकारिणीत नेमली आहेत, बाकी काय? ईव्हीएम, निवडणूक आयोग, ईडी, खोकी हेच भाजपचे खरे कार्यकारिणी सदस्य आहेत. नवे ‘खजिनदार’ खऱ्या कार्यकारिणीस इंधन पुरवण्याचे काम करतीलच करतील. 

भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची नियुक्ती होऊन सात महिने झाले. त्यानंतर आठव्या महिन्यात त्यांची कार्यकारिणी जाहीर झाली. कारण कार्यकारिणी असली काय किंवा नसली काय, सध्याच्या भाजपला काय फरक पडतो? अमित शहा, मोदी वगैरेंना हवाय त्याच दिशेने पक्षाचा गाडा हाकला जाईल आणि तो गाडा मुकाटपणे हाकतील अशी माणसे शोधून त्यांची कार्यकारिणी करणे अवघड नसते. तरीही त्यांना सात महिने लागले हे विशेष. या काळात नितीन नबीन यांनी बिहारमधील त्यांची आमदारकीची जागा रिकामी केली, त्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. राष्ट्रीय अध्यक्ष आपली विधानसभेची जागा राखू शकले नाहीत. भाजपला ठकास महाठक मिळाले की, त्यांची पीछेहाट होते. बांकीपुरात प्रशांत किशोर नावाचा महाठक समोर आल्याने भाजपचे निवडणुकीतील सर्व ‘चालबाज’ धंदे उघडे पडले. भाजप कोणत्याही निवडणुका सरळ मार्गाने जिंकूच शकत नाही हे उघड झाले. आता असे समोर आले आहे की, प्रे. ट्रम्प यांनी म्हणे भारतीय निवडणूक पद्धतीचे कौतुक केले आहे. एक फ्रॉड माणूस दुसऱ्या ‘फ्रॉड’ यंत्रणेचे कौतुक करतो यात नवल ते कसले? अमेरिकेतील सार्वत्रिक निवडणुकीत ‘ईव्हीएम’चा वापर होत नाही. ‘ईव्हीएम’ पद्धती हा एक घोटाळा आहे व त्यामुळे निकाल बदलले जाऊ शकतात, असे श्रीमती तुलसी गबार्ड व एलन मस्क यांनी याआधीच जाहीर केले आहे. भारतात त्याच ‘ईव्हीएम’ने निवडणुका होतात. अमेरिकेत मतपत्रिकेद्वारे सर्व निवडणुका होतात. भारतातही

त्याच पद्धतीने निवडणुका

व्हाव्यात ही मागणी निवडणूक आयोगाने व सुप्रीम कोर्टाने फेटाळली यातच निवडणूक घोटाळ्याची बीजे रोवली आहेत. हे सांगायचे यासाठी की, भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवडणुका जिंकण्याची जबाबदारी अजिबात नाही. ते काम भाजपवाल्यांनी ईव्हीएम, निवडणूक आयोग, पोलीस बल व पैशांची खोकी यांवर सोडले आहे आणि हीच भाजपची खरी कार्यकारिणी आहे. या कार्यकारिणीचे अध्यक्ष अमित शहा आहेत. त्यामुळे नवी राष्ट्रीय कार्यकारिणी काय करणार? हा प्रश्नच आहे. पुन्हा भाजपच्या या नव्या कार्यकारिणीत कोण आहेत, ते पाहणे रंजक आहे. भारतातील सगळ्यात श्रीमंत असलेल्या या पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी केंद्रीय व्यापार मंत्री पीयूष गोयल यांना निवडले आहे हे धक्कादायक तितकेच अनैतिक आहे. सत्तेवरील पक्षाचा खजिनदार एक केंद्रीय मंत्री असणे याचा अर्थ त्याने सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचार, लूट, दलाली करून पक्षाचा खजिना भरावा, असाच होतो. एकतर गोयल यांनी नैतिकतेच्या मुद्दय़ावर मंत्रीपद सोडायला हवे व त्यानंतर खजिन्याची राष्ट्रीय जबाबदारी स्वीकारावी. अर्थात नैतिकता वगैरेंशी भाजपचा तसा संबंध राहिलेला नाही. भाजपच्या खजिन्यात सध्या सात हजार कोटी इतके धन जमा आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षाची भव्य कार्यालये उभी राहिली ती काय कार्यकर्त्यांच्या वर्गणीतून किंवा श्रमदानातून नाही. हा श्रीमंतांचा पक्ष श्रीमंतांसाठी देशाच्या लुटीतून चालवला जातो आहे. त्या लुटमारीतून अयोध्येतील श्रीरामाच्या दानपेट्याही सुटल्या नाहीत. पीयूष गोयल हे व्यापार मंत्री खजिनदार झाल्याने ते

भाजपचा खजिना

आणि भारताचे व्यापारी करार, लायसन्स वगैरेंशी सांगड घालतील. भाजपच्या ‘नबीन’ टीममध्ये ‘नवीन’ असे काय आहे? जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राम माधव यांच्यावर टेंडरबाजी व कमिशनबाजीचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांना पक्षकार्यापासून काही काळ लांब ठेवले गेले. मात्र ते राम माधव आता नव्या जोमाने नवीन कार्यकारिणीत अवतरले आहेत. राष्ट्रीय ‘आयटी’ सेलमधून बदनाम अमित मालवीय यांना हटवले. ‘जंतर मंतर’वरील तरुण पोरांनी त्या काळात भाजपच्या ‘आयटी’ सेलची पार वाताहत केली. त्यामुळे मालवीय यांना घरी पाठवले गेले. आयटी सेल ‘जंतर मंतर’ आंदोलन बदनाम करण्यास, थोतांडे रचण्यात कमी पडले. आता मालवीय यांच्या जागी कुणी दीपक म्हस्के आले. स्मृती इराणी यांचा वनवास संपवून त्यांना पक्षात जबाबदारी दिली आहे. वसुंधराराजे शिंदे, महाराष्ट्रातून अनुभवी नेते विनोद तावडे हे सरचिटणीसपदी कायम आहेत. भारती पवार यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीतील समावेश महाराष्ट्रातील भाजपसाठी आश्चर्यकारक आहे. तारीक मन्सूर या एकमेव मुस्लिम नेत्याला भाजपच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीत सामावून घेतले गेले आहे हे भारतातील मुस्लिम समाजावर उपकारच झाले म्हणायचे. भाजपची बरेच दिवस रखडलेली आणि आता जाहीर झालेली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणजे फार तेजस्वी किंवा शक्तिमान प्रकार नाही. मोदी-शहांना हवी तशी माणसे या कार्यकारिणीत नेमली आहेत, बाकी काय? ईव्हीएम, निवडणूक आयोग, ईडी, खोकी हेच भाजपचे खरे कार्यकारिणी सदस्य आहेत. नवे ‘खजिनदार’ खऱ्या कार्यकारिणीस इंधन पुरवण्याचे काम करतीलच करतील.