मुंबईत शाळांच्या कॅन्टिनमध्ये आता पोहे, शिरा, उपमा; तुकाराम मुंढेंच्या निर्णयामुळे वडापाव, समोसा, कोलाची विक्री बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कायद्याचा धाक दाखवताच अनेक जण वठणीवर आले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आता मुंबई महापालिकेच्या शाळांमधील कॅन्टिनमधल्या मेन्यूत बदल झाला आहे. मुंबईतील शाळांच्या कॅन्टिनमध्ये आता वडापाव, समोसा, कोला हे विकणे बंद करण्यात आले असून त्याजागी पोहे, शिरा, उपमा, इडली, ताकचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबईसह राज्यभरातल्या शाळांच्या ५० मीटरच्या परिघात कुठलेही कॅलरी वाढवणारे किंवा पिण्यास अयोग्य, घातक असे पदार्थ, पेये विकली जाऊ नयेत अशा आदेशांची अंमलबजावणी तुकाराम मुंढेंनी केली. तसेच शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक या सगळ्यांनीच असे काही घडत असेल तर तक्रार करा असे आवाहन केले. मुंबईतल्या शाळांमधल्या कँटीनमध्ये आता वडापाव, समोसा, कोला याऐवजी इडली, पोहे, डोसा, शिरा आणि उपमा हे पदार्थ मिळू लागले आहेत. तसेच शीतपेयांची जागा ही ताकाने घेतली आहे.

शाळांच्या परीघात जंक फूड, तत्सम शीतपेये, घातक द्रव्ये असलेली पेये विकू नयेत असे आदेश एफडीएने काढले. मुलांना सुरक्षित अन्न आणि समतोल आहार दिला गेला पाहिजे हा नियम २०२० चा आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी सध्या सुरू झाली आहे.

पालिकेने सरकारी आणि खासगी शाळांमधील ९०० प्रतिनिधी तसेच ५० मध्यान्ह भोजन पुरवठादारांसाठी जनजागृती अभियान आयोजित केले. एबीईने तळलेले इतर पदार्थ देणेही बंद केले आहे. कँटीनना इडली, डोसा, पोहे, शिरा आणि उपमा यांसारखे पदार्थ देण्यास सांगितले आहे, असे अनेक शाळा चालवणाऱ्या एबीईचे फ्रान्सिस स्वामी यांनी सांगितले.