
बागेश्वर धामचे महंत पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. याचे फोटोही समोर आले असून यावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच संजय राऊत यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ हे पुस्तक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेट पाठवले आहे.
संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या एक्स अकाऊंटवरून धीरेंद्र शास्त्री आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीचे फोटो शेअर केले. आपल्या महान राष्ट्रपती महोदयांनी परमात्मा धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतली व अनेक राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा केली! देश आगे जा रहा है … राष्ट्रपती महोदयांना मी प्रबोधनकार ठाकरे यांचे “देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे” हे क्रांतिकारी पुस्तक भेट म्हणून पाठवले आहे! असे संजय राऊत यांनी म्हटले.
आपल्या महान राष्ट्रपती महोदयांनी
परमात्मा धिरेंद्र शास्त्री यांची भेट घेतली व अनेक राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा केली!
देश आगे जा रहा है
राष्ट्रपती महोदयाना मी प्रबोधनकार ठाकरे यांचे “ देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे “ हे क्रांतिकारी पुस्तक भेट म्हणून पाठवले आहे! pic.twitter.com/ux2eTEXpSM— Sanjay Raut (@rautsanjay61) August 21, 2026
याबाबत मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्येही संजय राऊत यांना विचारण्यात आले असता, संविधानिक पदावर बसलेल्या राष्ट्रपतींसारख्या व्यक्तींना याची नितांत गरज आहे, असे ते म्हणाले. कुणी धार्मिक असण्याबद्दल प्रश्न नाही. पण राष्ट्रपती भवनातील एक फोटो मी शेअर केला. धीरेंद्र शास्त्री यांच्यासोबत राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा केली. त्यामुळे राष्ट्रपतींना प्रबोधनकारांचे एक पुस्ताक पाठवले. देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे हे पुस्तक त्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. नरेंद्र मोदी यांनाही हे पुस्तक पाठवावे लागेल. जे बुवाबाजीचे अवडंबर माजवत आहेत, धर्माच्या नावावर ढोंग करत आहेत, राम मंदिरासारख्या दानपेट्यांची लूट करत आहेत आणि त्या लुटीला जे पाठिंबा देत आहेत, त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्ताक पाठवतोय, असे संजय राऊत म्हणाले.


























































