
छत्रपती संभाजीनगर म्हणजे वैविध्याने नटलेले शहर! प्राचीन, ऐतिहासिक संस्कृतीबरोबरच आधुनिकतेची नवता ल्यालेल्या या शहराचे खानपानही असे लज्जतदार! शहरात आलेल्या नवागताचा पाहुणचारच होतो तो इथल्या ‘उत्तम’च्या इम्रतीने! अप्पा हलवाईच्या पेढ्यांनी गायत्रीच्या कचोरीने! ‘छत्रपती संभाजीनगरला गेलास अन् ‘पूर्णानंद’चा वडापाव खाल्ला नाहीस!’ हे वाक्य काळजाला घर करून जाणारे. शहरातील विद्यार्थ्यांच्या चार पिढ्या पोसणारा हा वडापाव आता शहराचा निरोप घेणार आहे! वडापाव गल्लोगल्ली मिळतील, पण काकूंनी कागदात गुंडाळून दिलेल्या त्या वडापावची चव कशी मिळणार!
कर्वे घराणे तसे प्रसिद्ध. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या उभारणीत कर्वे गुरुजींचाही सहभाग होता. हरिगोविंद कर्वे यांनी १९७१ मध्ये सरस्वती कॉलनीत छोटेसे स्टेशनरीचे दुकान सुरू केले. ‘पूर्णानंद’ हे दुकानाचे नाव. स्टेशनरीबरोबरच गोळ्या, बिस्किट, चॉकलेटही त्यांनी ठेवायला सुरुवात केली. दुकानात काचेच्या बरण्यांमध्ये मांडलेल्या लिमलेट, पेपरमिंटच्या गोळ्या, रावळगाव चॉकलेट घेण्यासाठी शाळेच्या मधल्या सुटीत झुंबड उडायची. पुढे त्यांची विजय आणि विनोद ही दोन्ही मुले ‘पूर्णानंद’च्या व्यापात गुंतली.
समोसा, मसाला पाव ते वडापाव…
स्टेशनरी, गोळ्या-चॉकलेटबरोबर काहीतरी ठेवावे असा विचार सुरू झाला. तेव्हा विजय आणि त्यांच्या पत्नी सीमा यांनी अगोदर समोसा ठेवायला सुरुवात केली. बटाट्याची चटकदार भाजी, त्याला मैद्याच्या त्रिकोणी वेष्टणाचे कोंदण! शहरवासियांना हा पदार्थ तसा नवा. पण त्याला प्रतिसाद चांगला मिळाला. कर्वे कुटुंबाचे मुंबईला जाणेयेणे. त्यामुळे तेथील वडापाव परिचित. वडापाव ठेवला. पण समोसाची चटक त्याला येत नव्हती. मग सीमाकाकूंनी त्यात थोडा बदल केला. बटाट्याच्या भाजीवर अलवार लिंबू पिळायचे! थोडीशी आंबट अशी ही चव जिभेला चटक लावून गेली! त्यासोबत शेंगदाण्याची थोडीशी तिखट चटणी! विद्यार्थ्यांच्या चार पिढ्या या वडापावने पोसल्या!
काका-काकू आणि वडापाव
सरस्वती भुवन, शारदा मंदिर, आ. कृ. वाघमारे शाळांच्या माजी विद्यार्थ्यांची संमेलने होतात तेव्हा ही पिढी आवर्जून ‘पूर्णानंद’च्या समोर उभे राहून वडापाववर ताव मारते. मग तो कितीही मोठा अधिकारी असो, प्राध्यापक असो की उद्योगपती! ‘पूर्णानंद’ हे विद्यार्थ्यांना कधी दुकान वाटलेच नाही! खिशात पैसे नसले की काकूंच्या बरोबर लक्षात येत असे! ‘उद्या आठवणीने पैसे आण बरं का…’ असे म्हणत त्या हळूच वडापावचा कागद त्या चिमुकल्याच्या हातावर ठेवत हा आनंद उपभोगलेले कित्येक विद्यार्थी आजही त्या आठवणीने मोहरून जातात.
पिढी बदलली, पण वडापाव नाही
विजय कर्वे यांच्याकडून ‘पूर्णानंद’चा वारसा पद्मनाभकडे आला. पण वडापावच्या चवीत बदल झाला नाही. समोसा, वडापावच्या सोबतीला मसाला पाव, इडली, दाबेली, सँडविच आले. मग ढोकळाही आला. पण वडापावची सर कोणालाच आली नाही! विद्यार्थी, त्यांचे पालक, रिक्षावाले काका, शाळेतले शिक्षक असा हा वडापाव परिवारच ‘पूर्णानंद’ने उभा केला! आता विद्यार्थ्यांच्या पार्ष्या कॅफे, रेस्टॉरंटमध्ये होतात. ‘पूर्णानंद’ने अशा वडापाव पार्थ्यांचे ऐश्वर्य बघितले आहे. ‘पूर्णानंद’चा वडापाव खाऊ घालणे म्हणजे प्रतिष्ठाच!
बंदी घालणाऱ्यांनी एकदा हा वडापाव खावाच
शाळेच्या ५० मीटर परिघात तळीव पदार्थ विक्रीला मनाई असल्याचे चवहीन कारण पुढे करून शहरात ‘वडापाव कल्चर’ निर्माण करणाऱ्या ‘पूर्णानंद’च्या वडापावला अन्न आणि औषधी प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. ‘तुम्ही इडली, ढोकळाच विका’ असे फर्मानही काढण्यात आले आहे. इडली दाक्षिणात्य, ढोकळा गुजराती! अस्सल रांगड्या तेजतर्रार वडापावची चव त्याला कशी येणार? अन्न आणि औषधी प्रशासनाने बंदी घालण्यापूर्वी एकदा वडापाव खाल्ला असता, तर नक्कीच त्यांनी या निर्णयाचा फेरविचार केला असता!
- अन्न आणि औषधी विभागाने केलेल्या सूचनेवरून कर्वे कुटुंबाने सध्या ‘पूर्णानंद’ बंद केले आहे. लवकरच नवीन रूपात ‘पूर्णानंद’ पुन्हा सेवेत दाखल होणार आहे. तळलेले पदार्थ, चॉकलेट, बिस्किट आता ‘पूर्णानंद’ मध्ये मिळणार नाहीत. केवळ पोषक पदार्थच विकता येतील असे या विभागाने स्पष्ट केले आहे. इडली, ढोकळा हे पदार्थ पोषक श्रेणीत कसे येतात हे अन्न, औषधी विभागालाच माहिती. नव्या रूपात ‘पूर्णानंद’ सेवेतही दाखल होईल, पण वडापावशिवाय ‘पूर्णानंद’ कसा? तो अपूर्ण, अधुरा आनंद आहे ही चुटपुट नक्कीच असेल!


























































