
आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, तोदेखील केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रताप जाधव यांच्या मतदारसंघात! ग्रामीण रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर एक गर्भवती महिला अडली. वेदनांनी तडफडत असलेल्या त्या महिलेच्या शुश्रुषेसाठी नर्सने रस्त्यावर येण्यास नकार दिला. शेवटी रस्त्यावरच त्या महिलेने बाळाला जन्म दिला.
मेहकर ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्यावरच राहणाऱ्या एका गर्भवतीला आज सकाळी प्रसूतीकळा सुरू झाल्या. तिचा पती ऑटोरिक्षा आणण्यासाठी गेला. वेदना असह्य झाल्याने ती महिला ओटय़ावर पडली. बालाजी अर्बनचे अध्यक्ष योगेश सौभागे यांनी महिलेची अवघड परिस्थिती पाहून ग्रामीण रुग्णालय गाठले, पण तेथील डॉक्टर बेपत्ता होते. त्यांनी तेथील स्टाफ नर्सला मदतीसाठी येण्याची विनंती केली, परंतु नर्सने डॉक्टर नाहीत आणि रुग्णालयात आपण एकटय़ाच आहोत, असे सांगून बाहेर येण्यास नकार दिला.
ग्रामीण रुग्णालयातून मदत मिळत नसल्याचे पाहून योगेश सौभागे यांनी खासगी रुग्णालयातील नर्सला मदतीसाठी बोलावले. त्या नर्सने रस्त्यावरच आडोसा करून अडलेल्या महिलेची सुखरूप सुटका केली. प्रसूतीनंतर बाळ, बाळंतणीला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
नागरिकांचा संताप; आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
रुग्णालयापासून काही अंतरावर एक महिला प्रसूतीच्या वेदनांनी तडफडत असताना तिला वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नसल्याची घटना गंभीर असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत उपलब्ध वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मानवी दृष्टिकोनातून तातडीने मदत करणे अपेक्षित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या गैरहजेरीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






























































