राज्यातील सर्वच रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडिट करा! अमरावती अग्निकांडानंतर आरोग्य मंत्र्यांचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील सर्व शासकीय, खासगी व धर्मादाय आरोग्य संस्थांमधील फायर ऑडिट, विद्युत सुरक्षा, इमारत बांधकाम तसेच रुग्णालयातील संबंधित यंत्राचे ऑडिट करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

अमरावती येथील अग्नितांडवाच्या पार्श्वभूमीवर आबीटकर यांनी उच्चस्तरीब बैठक बोलावली होती. सर्व आरोग्य संस्थांनी अग्निसुरक्षा उपाययोजनांचे नियमित मूल्यांकन करून त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. अग्निसुरक्षेबाबतीत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे आरोग्य मंत्री म्हणाले.

आयसीयू, एनआयसीयू, ऑपरेशन थिएटर्सची विशेष तपासणी

रुग्णालयातील आयसीयू, एनआयसीयू, नर्सरी, ऑपरेशन थिएटर यांसारख्या संवेदनशील व महत्त्वाच्या विभागांमधील अग्निसुरक्षा सज्जतेचा विशेष आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच विद्युत सुरक्षा, वैद्यकीय गॅस पाइपलाईन प्रणाली, आपत्कालीन स्थलांतरण व्यवस्था, अग्निशमन उपकरणांची उपलब्धता व कार्यक्षमता, कर्मचारी प्रशिक्षण आणि मॉक ड्रिल यांचीही तपासणी करण्यात यावी. तपासणीमध्ये आढळून येणाऱ्या त्रुटी व कमतरतांची नोंद करून त्यानुसार प्राधान्यक्रम निश्चित करावा आणि आवश्यक त्या उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात, असेही निर्देश देण्यात आले आहेत.