
केंद्रातील मोदी सरकारच्या पक्षपाती धोरणांविरोधात तसेच प्रलंबित मागण्यांसाठी ‘रिटायर्ड रेल्वे पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशन्स’ आणि ‘नॅशनल को-ऑर्डिनेशन कमिटी ऑफ पेन्शनर्स असोसिएशन्स’ यांनी एकत्रित येत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. गुरुवारी, 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांच्या कार्यालयासमोर रेल्वे पेन्शनर्स आणि केंद्र सरकारी पेन्शनर्स यांचे संयुक्त ‘विशाल प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर 2025 रोजी 8व्या वेतन आयोगाची स्थापना करताना जाहीर केलेल्या अटी व शर्ती अत्यंत खेदजनक असल्याचे पेन्शनर्स संघटनांचे म्हणणे आहे. या अटींमध्ये 20 जून 2026 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांसह सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संशोधनाचा उल्लेखच केलेला नाही. सरकारने पेन्शन दुरुस्तीचा मुद्दा पूर्णपणे डावलल्यामुळे देशभरातील पेन्शनर्समध्ये तीव्र असंतोष आहे. याच पार्श्वभूमीवर ‘नॅशनल को-ऑर्डिनेशन कमिटी ऑफ पेन्शनर्स असोसिएशन्स’च्या आवाहनाला अनुसरून गुरुवारी मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांच्या कार्यालयासमोर ‘विशाल प्रदर्शन’ आयोजित केल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. आंदोलनात मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या पाचही विभागांतील रेल्वे पेन्शनर्स सहभागी होणार आहेत.































































