
अमराठी रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी चार महिन्यांची मुदत दिल्यानंतरही अद्याप हजारोंच्या चालकांना मराठी येत नसल्याचे तपासणीत समोर आले आहे. तसेच मराठी बोलण्यावरून वादावादीच्या घटनाही घडू लागल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाने रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी आणखी चार महिन्यांची मुदत दिली आहे. त्यानंतरही मराठी बोलता आले नाही तर कारवाई अटळ असेल, अशी तंबी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
राज्यात परिवहन अधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेत शेकडो चालकांना रोज नोटिसा बजावल्या जात आहेत. या कारवाईवरून अनेक ठिकाणी चालकांबरोबर वाद झाल्याचेही समोर आले. त्यानंतर मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी चालकांच्या संघटनांकडून पुढे आली. परिवहन मंत्री सरनाईक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
105 दिवसांच्या विशेष उपक्रमाद्वारे राज्यातील 1 लाख 65 हजार 800 रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण दिले आहे. चालकांना मराठी शिकण्यासाठी आणखी चार महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून, रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून कार्यशाळा सुरू ठेवण्यात येणार आहे.
अतिरिक्त मुदत देण्याबाबत सरनाईक म्हणाले की, संबंधित चालकांना एक महिन्याची प्रारंभिक मुदत देण्यात येईल. त्यानंतर आवश्यक असल्यास पुढील तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येईल. या कालावधीत चालकांना मराठी शिकण्याची संधी दिली जाईल. या तीन महिन्यांच्या कालावधीत बॅज रद्द केला जाणार नाही. त्यानंतरही मराठी भाषा शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास कायद्यानुसार बॅज रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असे सरनाईक यांनी सांगितले.






























































