
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कनिष्ठ लिपिकपदाच्या लेखी परीक्षेसाठी बीड, नांदेड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, अकोला या जिल्ह्यांत परीक्षा केंद्रे आल्याने सांगली जिल्ह्यातील तरुणांमध्ये प्रचंड संताप आहे. जिल्हा बॅँकेलाही ही परीक्षा केंद्रे मान्य नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील उमेदवारांची परीक्षा सांगलीसह फार तर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातच घ्यावी, यासाठी महिनाभर परीक्षा पुढे ढकलावी लागली तरी हरकत नाही, अशी मागणी ‘आयबीपीएस’ कंपनीकडे केल्याचे बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सांगली जिल्हा बँकेत कनिष्ठ लिपिकपदाच्या 444 जागांसाठी अर्ज केलेल्या सांगली जिह्यातील हजारो उमेदवारांची परीक्षा केंद्रे बीड, नांदेड, अकोला, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर या जिह्यांत आली आहेत. या परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी उमेदवारांना वेळेचा, तसेच आर्थिक भुर्दंड पडणार आहे. या उमेदवारांनी अर्ज भरताना सांगली, तसेच शेजारच्या कोल्हापूर, सातारा, पुणे या जिह्यांतील परीक्षा केंद्रांचा प्राधान्यक्रम दिला होता. मात्र, याचा विचार न करता, परीक्षा प्रक्रिया राबवणाऱया ‘आयबीपीएस’ कंपनीने लांब असलेल्या जिह्यात केंद्र दिले आहे. सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांनीही याला विरोध करत ही परीक्षा केंद्रे बदलावीत; अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, बँकेच्या संचालकांनीही या परीक्षा केंद्रांना तीक्र विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या संचालक मंडळाची तातडीची बैठक पार पडली.
या बैठकीत परीक्षा केंद्रे तातडीने रद्द करावी. लागल्यास महिनाभर परीक्षा पुढे ढकलावी; पण सांगली जिह्यातील उमेदवारांसाठी सांगलीसह फार तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे या जिह्यांतच परीक्षा केंद्रे करावीत, अशी मागणी आयबीपीस कंपनीकडे लेखी स्वरूपात करण्यात आली आहे. याबाबत संचालक मंडळाचा ठरावही झाला असून, त्याची माहिती आयबीपीएस कंपनीला कळविली आहे.































































