
पंचांग पाहण्यासाठी आता ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही. मंत्रालय किंवा विधान भवनात गेल्यावर वेळेसह संपूर्ण दिनविशेष आणि ग्रहस्थिती एका मिनिटात समोर येईल; कारण महायुती सरकार तब्बल ११ लाख रुपये खर्चून ही माहिती देणारे ‘कालायन’ यंत्र मंत्रालय आणि विधान भवनात बसवणार आहे.
मंत्रालय आणि विधान भवनाच्या प्रांगणात, तसेच पुरातत्व विभागाच्या १४ कार्यालयांच्या प्रांगणात हे कालदर्शक यंत्र बसवण्यात येणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे यात भारतीय प्रमाण वेळ, सूर्योदय आणि सूर्यास्त, ग्रहांची स्थिती-गती, पंचांग आणि दिनविशेषासह महत्त्वाच्या कालखंडांची माहिती मिळणार आहे. हे यंत्र प्राचीन खगोलशास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी केला. ‘अर्श विद्या प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेने या यंत्राची निर्मिती केली आहे. पुरातत्व विभागाने हे कालायन यंत्र मंत्रालय आणि विधान भवन यांच्या प्रांगणात बसवण्यासाठी शासनाकडे अनुमती मागितली होती, त्याला शासनाने मान्यता दिली आहे.






























































