14 फुटांवरील अनधिकृत झोपड्यांवरील कारवाईला शिवसेनेचा विरोध; भाजपच्या दुटप्पी भूमिकेचा घेतला समाचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील 14 फूट किंवा त्यापेक्षा अधिक उंचीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याच्या महापलिका प्रशासनाच्या निर्णयाला शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. त्याचबरोबच निवडणुकीत मतांसाठी आधी अशा अनधिकृत बांधकामांना परवानगी द्यायची आणि निवडणूक झाल्यानंतर त्यावर हातोडा चालवायचा, या भाजपच्या संधीसाधू भूमिकेवर शिवसेनेने कडाडून हल्ला केला.

झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेकडून 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत 14 फूट किंवा त्यापेक्षा अधिक उंचीचे बांधकाम तोडण्यात येणार आहे. या निर्णयाला विरोध करताना महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुळात कोणत्याही अनधिकृत बांधकामांना कधीच समर्थन नाहीच. पण मतांसाठी उंच झोपड्यांना म्हणजे 14
फुटांपासून 18 फुटांपर्यंतचे बांधकाम करायला परवानगी देणारे आता विरोध करायला लागले आहेत. आमचा भाजपच्या या भूमिकेला कडाडून विरोध आहे. मुळात अशा बांधकामांना परवानगी देणारे विभाग अधिकारी किंवा संबंधित अधिकारी यांना निलंबित का नाही केले, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला.

शिवसेना आमदारांनी सत्ताधारी भाजपच्या भूमिकेचा समाचार घेतला. यासंदर्भात झालेल्या बैठकीत आमदार सुनील प्रभू, आमदार अॅड. अनिल परब आणि आमदार सुनील शिंदे यांनी 14 फुटांवरील अनधिकृत झोपडय़ांवरील कारवाईला  विरोध  केल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.