ठसा – मुश्ताक खान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चित्रपटांतून छोटय़ा छोटय़ा भूमिका साकारत आपल्याला आपली कारकीर्द पुढे न्यायची आहे हे एकदा का स्वतःशीच ठरवले की त्या छोटय़ा छोटय़ा भूमिकेत काम करण्याचा आनंदही मिळतो आणि मोठय़ा प्रमाणावर विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारायला मिळतात. मुश्ताक खानने असेच मार्गक्रमण केले. सईद मिर्झा दिग्दर्शित ‘अल्बर्ट पिन्टो को गुस्सा क्यूं आता है ’ (1980) या चित्रपटात अगदी छोटय़ा भूमिकेत काम करत हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलेल्या मुश्ताक खान यांनी तब्बल पंचेचाळीस वर्षे कार्यरत राहण्यात यश प्राप्त केले. थोडीसी बेवफाई, सजा ए मौत, कालिया, अंगारे, हम है राही प्यार के, आशिकी, क्रांतिवीर, गोपी किशन, चाहत, मन, जोडी नंबर वन अशा अनेक चित्रपटांतून भूमिका साकारताना महेश भट्ट, अनिल शर्मा, मेहुलपुमार अशा अनेक दिग्दर्शकांच्या चित्रपटांतून भूमिका साकारण्यात यश प्राप्त केले. चित्रपटांत काम मिळत राहावं म्हणून मुश्ताक खान ऐंशी-नव्वदच्या दशकात नवीन चित्रपटाच्या मुहूर्तांना उपस्थित राहून निर्माता आणि दिग्दर्शकांच्या सदिच्छा भेटी घेत. आपली काही दृश्ये कापली गेली तरी ते उगाच तक्रार करत नसत. चित्रपट माध्यम आणि व्यवसायाचा तो एक भाग आहे असे ते मानत. असा व्यावसायिक संयम त्यांनी आत्मसात केला होता. भूमिका सर्वसाधारण असो अथवा विनोदी, मुश्ताक खान ती भूमिका सारख्याच उत्साहाने करत.

 झी हॉरर, टेढे मेढे सपने, पुछ रंग प्यार के ऐसे भी अशा अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. त्यात मात्र त्यांना काही व्यक्तिरेखा साकारायला संधी मिळाली.

चित्रपटाच्या जगात वावरताना त्यांनी कायमच आपलं खासगी आयुष्य जपले. चित्रपट जगाच्या झगमगाटापासून आपलं कुटुंब दूर असावं असा त्यांनी कायम प्रयत्न केला. आपली पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी यांच्यासह त्यांनी आपल्या खासगी आयुष्याला प्राधान्य दिले. 2021 साली इन्स्टाग्रामवर त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो पोस्ट झाल्याचे दिसून आले. त्यांचा धाकटा मुलगा मोहसीन खान यांनी चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनात वाटचाल करताना आपला मार्ग तयार केला. विशेष म्हणजे मोहसीन खानने ‘डिलीव्हरी बॉय’ या विनोदी मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. मुश्ताक खान यांचे काही महाराष्ट्रीय कलाकारांशी चांगले संबंध होते.

एकदा मात्र मुश्ताक खान वेगळ्याच संकटात सापडले. एका समारंभासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले असता ते मुंबईहून दिल्लीला पोहोचले. तेथून विमानतळावरून ते मेरठ येथे जात असताना काही जणांनी त्यांचे अपहरण केले आणि त्यांना बिजनोरजवळील एका निर्जन ठिकाणी नेले आणि त्यांच्याकडून एक कोटी रुपयांची मागणी केली. या संकटातून त्यांना सुदैवाने बाहेर पडता आले.

आपण बरे आणि आपलं काम बरं अशा वृत्तीने त्यांनी आपली अभिनय कारकीर्द घडवली. त्यामुळे ते आयुष्यातील चढउतारात स्थिर राहू शकले.

दिलीप ठाकूर