
सणासुदीच्या काळात रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 1 ऑक्टोबरपासून रेल्वेची तिकीट तपासणी अधिक कडक होणार असून 31 ऑक्टोबरपर्यंत विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत केवळ तिकीट आहे की नाही, एवढीच तपासणी होणार नाही, तर तिकीटाची वैधता, आरक्षणाचा कोटा, सवलतीचा लाभ आणि प्रवाशाची ओळख यांचीही पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तिकीटासोबत मूळ ओळखपत्र जवळ ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.
1 ते 31 ऑक्टोबरदरम्यान विशेष तपासणी
मध्य रेल्वेकडून 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर तिकीटांमधील अनियमितता, सवलतींचा गैरवापर आणि बनावट अथवा अवैध तिकिटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान ओळखपत्र म्हणून खालीलपैकी कागदपत्रे ग्राह्य धरली जातात
* मतदार ओळखपत्र (Voter ID)
* पासपोर्ट
* PAN कार्ड
* RTOकडून जारी केलेले ड्रायव्हिंग लायसन्स
* केंद्र किंवा राज्य सरकारने जारी केलेले क्रमांकासह फोटो ओळखपत्र
* मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयाचे फोटो असलेले विद्यार्थी ओळखपत्र
* फोटो असलेले बँकेचे पासबुक
* बँकेने जारी केलेले क्रेडिट कार्ड
* आधार कार्ड
विनातिकीट प्रवासांना दंड
रेल्वेच्या या विशेष तपासणी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. 20 जून 2026 पासून विनातिकीट प्रवासासाठी आकारण्यात येणारा किमान अतिरिक्त दंड 250 रुपयांवरून 500 रुपये करण्यात आला आहे. याशिवाय सहा महिन्यांसाठी तुरूंगवासही होण्याची शक्यता आहे. हा बदल 2026 अंतर्गत रेल्वे कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार करण्यात आला आहे.
या विशेष मोहिमेचा उद्देश तिकीटांची सत्यता तपासणे, आरक्षण सुविधांचा गैरवापर रोखणे, सवलती आणि पासच्या गैरवापराला आळा घालणे तसेच रेल्वेच्या महसुलातील गळती कमी करणे हा आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवासापूर्वी तिकीट, आवश्यक मूळ ओळखपत्र आणि सवलत अथवा विशेष कोट्याचा लाभ घेत असल्यास त्यासंबंधीची कागदपत्रे व्यवस्थित जवळ असणे महत्त्वाचे असणार आहे.



























































