
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. देशातील निवडणूक घोटाळ्याचे सूत्रधार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याच्या मागणीसाठी 4 तारखेला आयोजित जनमोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ”जे जे लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करतील त्यांना आमचा पाठिंबा असेल” असे सांगितले.
या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी 4 तारखेला होणाऱ्या जनमोर्चाची रुपरेषा सांगितली. यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना कॉक्रोज जनता पार्टीच्या मोर्चाबाबत विचारले असता ते म्हणाले की, ”दोन तारखेच्या कॉक्रोज जनता पार्टीच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. यापूर्वी जंतरमंतरवरच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. काँग्रेसचा देखील मोर्चा पार पडला. जे जे लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करतील त्यांना पाठिंबा आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ असा नाही की आम्ही प्रत्येक आंदोलनाच्या व्यासपीठावर गेलं पाहिजे. प्रत्येकाने आपआपल्या वतीने जनतेचा एक एक वर्ग जागा केला पाहिजे. आणि त्यानंतर जर आवश्यक वाटलं तर एकत्रितपणे भीमटोला मारू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
निवडणूक आयोगातील बंडाळीनंतर देशातील मतचोरीवर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIR विरोधात शिवसेना-मनसेचा 4 ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा आयोजित करण्यात आला आहे. येत्या 4 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता भायखळा येथून या मोर्चाला सुरुवात होईल, मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीपर्यंत हा मोर्चा असणार असून त्यानंतर त्यानंतर तिथेच सभा सुरू होईल.
इंडिया आघाडीची उद्या बैठक
इंडिया आघाडीची उद्या दिल्ली येथे बैठक होणार आहे. त्यावर देखील याविषयावर चर्चा होईल व त्यात पुढे काय करायचं त्याबाबत रुपरेषा ठरेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.




























































