
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याच्या बहुप्रतीक्षित ‘दृश्यम 3’ चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली आहे. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, पहिल्या दिवसाच्या तिकीट विक्रीतून चित्रपटाने 9 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपट किती कमाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
29 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या शोसाठी 2.31 लाख तिकिटांची विक्री झाली होती. या तिकीट विक्रीतून चित्रपटाने ब्लॉक केलेल्या जागांसह 9.28 कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. 2 ते 4 ऑक्टोबर या पहिल्या तीन दिवसांच्या शोसाठीही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एकूण 4.57 लाख तिकिटांची विक्री झाली असून, आगाऊ बुकिंगमधून 17.66 कोटी रुपयांची कमाई झाल्याचे वृत्त आहे. प्रदर्शनाला अद्याप दोन दिवस शिल्लक असल्याने तिकीट विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
‘दृश्यम 3’च्या ॲडव्हान्स बुकिंगमधील वेग पाहता, चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. बुकिंगचा हा वेग कायम राहिला आणि प्रदर्शनाच्या दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, तर चित्रपट हिंदुस्थानात 40 कोटी रुपयांपेक्षा अधिक निव्वळ कमाई करू शकतो, असा विश्लेषकांचा अंदाज आहे. काही अंदाजांनुसार, चित्रपटाची पहिल्या दिवसाची निव्वळ कमाई 50 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, प्रत्यक्ष कमाई चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच स्पष्ट होईल.




























































