नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे नदीत डोंगराचा कडा कोसळून मोठी हानी, 24 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
नेपाळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पूर आणि भूस्खलनच्या विविध घटनांमध्ये अवघ्या 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. मुस्तांग जिल्ह्यात डोंगराचा महाकाय भाग कोसळून कालीगंडकी नदीचा मार्ग बंद झाला असून, नेपाळ एकाच महिन्यात दुसऱ्यांदा भीषण नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहे.
नेपाळच्या मुस्तांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे डोंगराचा महाकाय भाग अचानक कोसळून थेट कालीगंडकी नदीत पडला, ज्यामुळे नदीचा मार्ग तत्काळ माती आणि ढिगाऱ्यांनी भरून गेला. या घटनेचा एक व्हायरल व्हिडिओ समोर आला असून, त्यात काही सेकंदातच डोंगराच्या उतारावरून दगड आणि चिखलाचा महापूर खाली कोसळताना दिसत आहे. या भागातील पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पुरामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्याने नारायणी नदीला बांधलेल्या एका क्रूझ जहाजाचे दोर तुटले. हे जहाज सुमारे 100 मीटर वाहून गेले आणि एका पुलाच्या खांबाला जाऊन धडकले. नेपाळ एका महिन्यात दुसऱ्यांदा अशा प्रकारच्या भीषण पुराचा सामना करत आहे. यापूर्वी 26 ऑगस्ट रोजी भोटेकोशी नदीला आलेल्या महाप्रलयात 1,453 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 5,500 हून अधिक लोक अद्यापही बेपत्ता आहेत.