
गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजय नगर भागात एकावर गोळीबार झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीने तीन राऊंड फायर केले असून तिसऱ्या राऊंडमधील गोळी मांडीला लागल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमीला तातडीने गेवराईतील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी शारदा हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे.
संजय नगर येथील शेख मुसा हे घरासमोर उभे असताना त्यांच्या परिचयातील एकाने तेथे येऊन शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. आरोपीने जवळील बंदुकीतून दोन राऊंड हवेत फायर केले आणि तिसऱ्या राऊंडमध्ये शेख मुसा यांच्या गुडघ्यावरील मांडीवर गोळी झाडून घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेवराई पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.





























































