पंतप्रधान मोदींना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, काँग्रेसची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतदार यादीतील गैरप्रकार आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजातील तडजोडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “पंतप्रधान मोदींना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही,” अशी बोचरी टीका वेणुगोपाल यांनी केली आहे.

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सरचिटणीस जयराम रमेश यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत वेणुगोपाल बोलत होते. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगातील अंतर्गत वादाकडे लक्ष वेधले. दोन निवडणूक आयुक्तांनी निवडणूक आयोगाच्या अंतर्गत कामकाजाबाबत आणि निर्णयांबाबत कॅबिनेट सचिवांना पत्र लिहिले असून ही बाब थेट पंतप्रधानांच्या निदर्शनास आली असल्याचे वेणुगोपाल यांनी अधोरेखित केले. तसेच या प्रकरणात हस्तक्षेप करणे ही पंतप्रधानांची जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे कौतुक करताना वेणुगोपाल म्हणाले की, “मुख्य निवडणूक आयुक्त पूर्णपणे तडजोड करत असल्याचे आणि ईव्हीएम व मतदार याद्यांमध्ये सत्ताधारी भाजपला फायदा व्हावा यासाठी पद्धतशीरपणे फेरफार करण्यात आल्याचे पुरावे राहुल गांधींनी गेल्या १८ ते १९ महिन्यांपासून सातत्याने देशासमोर मांडले आहेत.”