ज्ञानेश कुमार बाहुले, मोदी-शहांचाही राजीनामा हवा; काँग्रेसची जोरदार मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे नरेंद्र मोदी सरकारच्या हातचे बाहुले असून त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला चढवला. मुख्य निवडणूक आयुक्तांवर दबाव आणल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही खरगे यांनी केली.

काँग्रेस कार्य समितीची आज बैठक झाली. त्यात खरगे यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, षडयंत्र रचून मतदार याद्यांमधून लोकांची नावे वगळली जात आहेत आणि मुख्य निवडणूक आयुक्त हे मोदी सरकारचे बाहुले बनले आहे. एसआयआर प्रक्रिया पात्र मतदारांच्या हक्कांचे उल्लंघन करणारी आहे. याची स्वतंत्र आणि कालबद्ध चौकशी झाली पाहिजे, असे खरगे म्हणाले. ज्ञानेश कुमार यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांना तत्काळ हटविले पाहिजे आणि त्यांच्यावर दबाव टाकणाऱ्या पंतप्रधान मोदींनीही राजीनामा दिला पाहिजे, असे खरगे म्हणाले.

एसआयआर तत्काळ थांबवा

एसआयआर प्रक्रिया तत्काळ थांबविण्यात यावी, मतदार याद्यांमधून हटविण्यात आलेली 13.30 कोटी नावे पुन्हा जोडावी, ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्या काँग्रेसच्या कार्य समितीमध्ये करण्यात आल्या. तर, मतदार याद्यांमधील बदलांची आकडेवारी जाहीर करावी. वगळण्यात आलेल्या मतदारांना अपीलाची संधी दिली जावी, तसेच राजकीय पक्षांना मतदार यादीची आकडेवारी वेळेत व सोप्या स्वरूपात उपलब्ध करावी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित महत्वाची माहिती आणि निर्णयांमध्ये पारदर्शकता हवी, जेणेकरुन कोणत्याही पक्षाला ‘माहिती लपवली जात आहे’, असे म्हणण्याची संधी मिळणार नाही, अशा मागण्या खरगे यांनी केल्या.

मोदीच राजीनामा घेतील – राहुल गांधी

काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतील, असा दावा राहुल गांधी यांनी केला. मुख्य निवडणूक आयुक्तांनी पूर्णपणे तडजोड केली असून देशातील निवडणूक व्यवस्था ‘फिक्स’ आहे. अलीकडे झालेल्या सर्व निवडणुका अवैध आहेत. ईव्हीएम असो किंवा मतदार याद्या, दोन्हींसोबत छेडछाड झाली आहे. दोन्हींचा वापर भाजप निवडणूक जिंकण्याची रणनीती म्हणून करत आहे, असा हल्ला राहुल गांधी यांनी केला. निवडणूक आयुक्तांना संरक्षण देण्यासंदर्भात 2023मध्ये करण्यात आलेला कायदा चुकीचा होता, असेही राहुल गांधी म्हणाले.