
बीड जिल्ह्यात दुष्काळाचे चटके आता असह्य होऊ लागले, गेल्या वर्षी अतिवृष्टी ने बरबाद केले यंदा कोरड्या दुष्काळाने हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला, शेतकरी हाताश झाला आहे, शेतातील उभे पीक पेटवून देत आहे, शेता शेतात दुष्काळाची धग आता असह्य होत आहे.
बीड जिल्ह्यात तब्बल सत्तर दिवस पावसाचा खंड पडला,जून जुलै महिन्यात पेरण्या आटोपल्या अन पावसाने दगा दिला, कसे बसे सोयाबीन तरी येईल असे वाटत होते, मात्र सोयाबीन फुलाला अन शेंगाला लागण्यापूर्वीच झाडानी मान टाकली, कापूस, तूर, उडीद, मूग, सूर्यफूल, तर गेलेच तीन लाख हेक्टर वरील सोयाबीन ही उध्वस्त झाले, शेंगा नसलेले झाड वाढवून काय उपयोग, पोटात अन डोक्यात पडलेली आग, आता शेता शेतात पसरत आहे.
बीड जिल्ह्यातील कुटेवाडी येथील पवन हनुमंत कुटे या शेतकऱ्याने काल आपल्या शेतातील सोयाबीन पेटवून दिले.. पावसाअभावी पिकाचे इतके नुकसान आले की त्या पिकाला शेंगाच लागल्या नाहीत..जिवापाड जपलेलं, कष्टयाने घेतलेलं पिक पेटवून देताना त्या शेतकऱ्याचा जीव तळमळ करत होता, बीड जिल्ह्यातील प्रत्येक गाव खेड्यात शेतकऱ्यांच्या वाट्याला असेच दुःख आले आहे.. पवन कुटे यांच्यावरील संकटाची आर्त हाक सरकारपर्यंत जाईल का असा प्रश्न निर्माण होत आहे.
































































