ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली; युवक काँग्रेसची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आता युवक काँग्रेसने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली असून, पोलिसांच्या या निर्णयाला कायदेशीर आव्हान दिले आहे.

गेल्या १ ऑक्टोबर रोजी दिल्ली पोलिसांनी युवक काँग्रेसच्या आंदोलनाच्या परवानगीचा अर्ज फेटाळून लावला होता. पोलिसांच्या या कृतीला आव्हान देणारी याचिका वकील रूपेश सिंग भदौरिया यांच्यामार्फत दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत म्हटले आहे की, शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार असून, पोलिसांनी परवानगी नाकारताना नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचा केवळ यांत्रिक पद्धतीने विचार केला आहे. संविधानाच्या कलम १९ (१)(अ) आणि १९ (१)(ब) अन्वये प्रत्येक नागरिकाला मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण मार्गाने एकत्र येण्याच्या अधिकारांवर गदा आणण्याचे काम दिल्ली पोलिसांनी केल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेसने केला आहे.

जंतरमंतर येथे नियोजित असलेले हे आंदोलन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या काही निर्णयांचा आणि कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या हेदेखील निदर्शनास आणून दिले आहे की, या आंदोलनादरम्यान सर्व कायदेशीर नियमांचे, कायदा व सुव्यवस्थेचे आणि अटींचे पालन करण्याची लेखी हमी संस्थेकडून देण्यात आली होती. असे असतानाही पोलिसांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवून आणि कोणतीही ठोस कारणे न देता परवानगी नाकारली आहे. आता या प्रकरणावर दिल्ली उच्च न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.