विज्ञान रंजन – ‘एल निनो’चा फेरा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक

‘एल निनो’च्या प्रभावामुळे फारच कडक दुष्काळ पडेल आणि पाऊस होणारच नाही इथपर्यंत भाकिते झाली. जून महिना जवळपास कोरडा गेल्यावर तर यंदा पावसाचे काही खरे नाही असे वाटू लागले. तोच जुलै महिना पावसाने गाजवला. जागतिक पातळीवरची दुष्काळाची भाकिते चुकली ते बरेच झाले असे वाटू लागले. अर्थात हिंदुस्थानातला हा पाऊस ‘इंडियन ओशन डायोड’ किंवा कमी दाबाचे पट्टे निर्माण होत असल्याने येतोय. त्यामुळे ‘एल निनो’ एकदमच निप्रभ ठरला असे वाटण्याचे कारण नाही, अशी सावधगिरीची भूमिका तज्ञ मंडळी घेत होती.

आपल्या खंडप्राय आणि कृषीप्रधान असलेल्या देशात चार महिन्यांचा पावसाळय़ाचा ऋतू हे निसर्गाचे वरदान आहे. ऋतुचक्रातल्या सहा ऋतूंमध्ये ‘वर्षा’ ऋतूला श्रावण-भाद्रपद हे दोनच महिने दिले असले तरी प्रत्यक्षात त्याचा आरंभ केरळम्मध्ये 1 जूनला होतो आणि शेवटी उत्तर-पूर्वेकडून (ईशान्येकडून) येणारा पाऊस सप्टेंबरअखेरीस गडगडाट, कडकडाट करत कोसळला की पावसाळय़ाची सांगता होते. जूनच्या सुरुवातीला उघडलेल्या छत्र्या चार महिन्यांनी मिटतात. ऑक्टोबरात चार-दोन सरी अपवादात्मक पडतील तेवढय़ाच.

सध्या त्या ‘चार-दोन’ सरत्या पावसाच्या सरींचा काळ आहे. ऑक्टोबरच्या महिन्यात साधारणतः देशातल्या पीकपाण्याचा ताळेबंद मांडला जातो. परंपरेने ‘नवान्न पौर्णिमे’ला किंवा अश्विन पौर्णिमेला शेतीभातीची वार्षिक ‘मिळकत’ नोंदली जाते. म्हणून ती पौर्णिमा साजरी करायची… पण तशी ‘सुगी’ असली पाहिजे ना! गेल्या अनेक दशकांचे पावसाचे आडाखे, पूर्वापार कधी ना कधी चुकलेच. मात्र गेल्या दशकभरात पावसाच्या लहरीपणाने ‘तापदायक’ स्वरूप निर्माण केलेय. देशात आणि राज्यात आज अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे.

राज्यात तर 74 टक्के तालुके (358 पैकी 265) दुष्काळग्रस्त झालेले दिसतात. केव्हातरी धो-धो पडलेल्या पावसाने नंतर ओढ दिल्याने अनेक ठिकाणी अवर्षणाची स्थिती आहे. मग टंचाई, अवर्षण, काही पाठभेद असले तरी शेवटी अर्थ एकच उरतो की, पुरेसे पाणी नाही आणि पीकही समाधानकारक येण्याची चिन्हे नाहीत. ‘दिवस सुगीचे सुरू जाहले’ अशी एक कविता आमच्या शालेय पुस्तकात होती. मास्तर ती दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी शिकवत; कारण तोपर्यंत खरंच पीकपाणी बहरलेले असायचे. आता काळ बदललाय. निसर्ग माणसासारखाच लहरी आणि बेभरवशाचा झालाय. त्याला अंशतः माणूसही कारणीभूत आहेच. उजळणीच करायची तर जर्मन संशोधक अलेक्झॅण्डर हॅम्बोल्ट यांनी सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी दिलेला पर्यावरणाचा तोल सांभाळण्याचा इशारा आपण कधीच वाऱ्यावर सोडला. त्यातून ‘ना निसर्ग थाऱयावर राहिला ना तथाकथित ‘प्रगती’.

या वेळचं चित्र आता स्पष्ट होऊ लागल्यावर काहीशी थबकलेली ‘एल निनो’ची आठवण जागी झाली. काय चाललंय या क्षणी या नैसर्गिक ‘फेऱया’चे? पावसाळी भूभागासाठी ‘एल निनो’चा फेरा दुर्दैवाचाच असतो. त्याबद्दलचे वृत्त असे की, पॅसिफिक नावाचा जगातला ‘प्रशांत’ मानला गेलेला महासागर अधिकाधिक अशांत होतोय. त्याच्या पृष्ठभागावरचे पाणी दिवसेंदिवस तापतेय. त्यात आता ‘ऑक्टोबर हीट’ नावाच्या परिणामाची भर. त्यामुळे ‘सुपर एल निनो’ आहेच. आणि ही दाहक परिस्थिती 2027च्या फेब्रुवारीपर्यंत अशीच राहणार असे म्हटले जातेय.

पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सप्टेंबरच्या मध्याला कधी नव्हे ते 30 अंशांपर्यंत (सेल्सियस) चढले. साहजिकच त्यावरच्या हवेत तापमानाची वाढ सरासरीपेक्षा 8 अंशांनी झाली. पॅसिफिकवरचे मंदावत जाणारे ‘व्यापारी वारे’ (ट्रेड विंड्स याविषयी आपण पूर्वी वाचलेय) आणि पश्चिमी वाऱ्यांचा उद्रेक यातून पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील थंडीची वाट लागण्याची दाट शक्यता आहे.

अशा ‘एल निनो’च्या विपरीत फेऱयात एकच आशेचा किरण पुन्हा एकदा दिसतोय तो उपकारक ‘इंडियन ओशन डायपोल’ तथा ‘आयओडी’चा. त्यानेच आपल्याला या वर्षी अपुराच, पण पाऊस दिला. थंडीही तोच परिणाम आणेल असे वाटतेय.

या वर्षी पडलेल्या पावसाचा हिशेब प्रसिद्ध झालाय. त्यात कोकणपट्टीतच येणाऱया मुंबई भागात 9 टक्क्यांची घट आहे, तर तीव्र दुष्काळी परिस्थिती असणाऱया मराठवाडय़ात तसेच सोलापुरात ती पन्नास ते साठ टक्क्यांच्या आसपास आहे. म्हणजे निम्म्याहून अधिक राज्यांत प्रतिवर्षीच्या निम्मासुद्धा पाऊस झालेला नाही. यावर उपाय? आहे… पाऊस पडो वा न पडो, ‘शाश्वत’ पाणीपुरवठय़ाची योजना आणि त्यासाठी पडणाऱ्या प्रत्येक थेंबाची जपणूक आणि साठवण. त्याचबरोबर कमी पाण्यावरच्या पिकांचे उत्पादन घेण्याचा कायमी आराखडा. निसर्ग कधी कसा वागेल काय सांगावे? आपण कसे वागावे ते आपल्या हाती आहे. पुढचा पावसाळा ‘सजल’ होण्यापर्यंत धीराने तग धरावा लागेल.