
‘एमपीएससी विद्यार्थ्यांच्या संघर्षाला भगवा सलाम!’, ‘हजारो विद्यार्थी अनेक दिवसांपासून रस्त्यावर बसले आहेत. हे महाराष्ट्रातले जंतर मंतर आहे. जंतर मंतरचा पॅटर्न असा आहे की मागण्या मान्य करून घेतल्याशिवाय विद्यार्थी मागे हटत नाहीत,’ बहिरेपणाचे सोंग घेतलेल्या फडणवीसांना दणका द्या, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलन स्थळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी सायंकाळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकार, आयोगाच्या कारभारावर सडपून टीका केली. या रस्त्यावरून उठणाऱ्या गर्जना थेट देवेंद्र फडणवीस यांच्या कानापर्यंत पोहोचल्या आहेत. पण त्यांनी बहिरेपणाचे सोंग घेतले आहे. हजारो तरुण रस्त्यावर उतरलेत, तुरुंगात जायलाही तयार आहेत; तरीही या सरकारचे डोळे उघडत नसतील तर यांना सत्तेचा अहंकार चढला आहे, असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्राचे प्रशासन हे एमपीएससीच्या खांद्यावर चाललेले आहे. पण हे सरकार या राज्याच्या प्रशासनामध्ये निर्माण होणाऱ्या एका अख्ख्या पिढीलाच बरबाद करायला निघाले आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये घोटाळे, पेपरफुटी आणि नोकरभरतीत आपल्या विचारांची, टोळ्यांमधली माणसे घुसवून अख्खे राज्य व्हाईट कॉलर माफियांच्या हातात देत आहात. प्रशासनाची वाट लावून एका तरुण पिढीचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचे हे पाप तुम्ही पुठे फेडाल, असा सवाल संजय राऊत यांनी केला. याप्रसंगी शिवसेनेचे सह संपर्पप्रमुख संजय मोरे, गजानन थरपुडे, शहरप्रमुख वसंत मोरे, पालिकेतील गटनेते नितीन गावडे उपस्थित होते.
मंत्रालयातून गाडी बाहेर पडू देणार नाही’
पुण्यात पेटलेले हे ‘जंतर मंतर’ जर उद्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिह्यात पेटले, तर मुख्यमंत्र्यांची गाडी मंत्रालयाच्या आणि घराच्या बाहेर पडू शकणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. स्पर्धा परीक्षांमधील घोटाळे, पेपरफुटी आणि नोकरभरतीचा बाजार बंद करून आयोगाचे वरपासून खालपर्यंत संपूर्ण शुद्धीकरण झाल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही.’
फडणवीसांनी ब्रिटिशांप्रमाणे एमपीएससी विद्यार्थ्यांत फूट पाडली
पुण्यात आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेल्या सुशिक्षित एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मूळ आंदोलनात देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक फूट पाडली आहे. फडणवीस ब्रिटिशांसारखी ‘फोडा आणि झोडा’ ही नीती वापरून आंदोलनाचे तुकडे करत आहेत, असा थेट आरोप शिवसेना नेते, खासदार राऊत यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.


































































