Chandrpur – आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे अर्धे टक्कल; शिस्तीच्या नावाखाली मनमानी कारभाराचा आरोप, अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थ्याचे अर्धे टक्कल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिस्तीच्या नावाखाली अधीक्षकांनी नाभिकाला विद्यार्थ्याचे अर्धे केस कापण्याचे निर्देश दिल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. शनिवारी केस कर्तन सुरू असताना काही विद्यार्थी खेळत असल्याने अधीक्षक संतापले आणि हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत तब्बल 82 विद्यार्थ्यांचे ट्रिमरच्या सहाय्याने केस कापण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत गिरी यांनी संबंधित अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र, केवळ नोटीस न बजावता या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.