
<< ब्रिगेडियर हेमंत महाजन
[email protected]
भारताने मागील युद्धांच्या अनुभवांवरच अवलंबून राहण्याऐवजी युक्रेनने ज्या पद्धतीने ‘ड्रोन’ युद्धाद्वारे बलाढ्य रशियाला जेरीस आणले आहे, त्यावरून भविष्यातील युद्धाचे स्वरूप ओळखले पाहिजे. ड्रोन स्वॉर्म, प्रतिड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चेतावणी प्रणाली, नागरिक संरक्षण यंत्रणा आणि त्वरित तांत्रिक नवकल्पना या सर्व क्षेत्रांत आताच गुंतवणूक करणे आवश्यक आहे. प्रश्न एवढाच आहे की, भारताचे राजकीय नेतृत्व, वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणा हे बदलते वास्तव वेळेत ओळखतील का? आणि भविष्यातील युद्ध जिंकण्यासाठी आवश्यक धाडसी निर्णय घेतील का?
माझ्या एका सैनिकी मित्राने नुकतीच युक्रेनला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी युक्रेन-रशियाच्या ड्रोन युद्धाचा कशा प्रकारे मुकाबला करत आहे, याविषयी मोठ्या प्रमाणावर माहिती संकलित केली. प्रस्तुत लेख हा त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे.
भविष्यातील युद्धांमध्ये ड्रोनचे महत्त्व झपाट्याने वाढत आहे. ड्रोनचा आक्रमक वापर प्रभावीपणे कसा करायचा, तसेच शत्रूच्या ड्रोन हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करायचे, हे आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचे विषय बनले आहेत. याशिवाय सामान्य नागरिकांचे संरक्षण, देशातील महत्त्वाच्या औद्योगिक आणि पायाभूत सुविधांची सुरक्षा तसेच ड्रोनविरोधी उपाययोजना या सर्व बाबींवर या लेखात सविस्तर चर्चा करण्यात येत आहे. ड्रोन स्वॉर्म आणि त्यावरील प्रतिकारक क्षमता विकसित करण्याची वेळ हीच आहे.
जून महिन्यात युक्रेनची राजधानी कीव्ह येथे एका हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा सुरुवातीला सर्व काही नेहमीप्रमाणेच वाटले. रिसेप्शनवर क्रेडिट कार्डची नोंद, नाश्त्याच्या वेळा, जिमची माहिती, वाय-फायचा पासवर्ड आणि धूम्रपानासंबंधी नियम सांगण्यात आले. मात्र त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी एक विशेष सूचना केली-प्रत्येक पाहुण्याने क्षेपणास्त्र, ड्रोन किंवा ग्लाईड बॉम्बहल्ल्यांचा इशारा देणारे मोबाईल अॅप डाऊनलोड करावे आणि जवळच्या बॉम्ब शेल्टरची माहिती करून घ्यावी.
हे अॅप अनेकांचे प्राण वाचवणारे ठरले आहे. युक्रेनियन प्रोग्रामर्सनी युद्ध सुरू झाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांत हे अॅप विकसित केले. वापरकर्ते आपला प्रांत आणि जिल्हा नोंदवून सामान्य सूचना मिळवू शकतात किंवा उझ्ए सुरू करून अगदी परिसरनिहाय इशारे प्राप्त करू शकतात. युक्रेन सरकार आणि अमेरिकन गुप्तचर संस्थांकडून मिळणाऱ्या वास्तविक वेळेतील माहितीच्या आधारे हे अॅप सतत अद्ययावत केले जाते.
रशिया-युक्रेन युद्धाने आधुनिक युद्धाची व्याख्याच बदलून टाकली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काही दिवसांत युक्रेन जिंकता येईल असे गृहीत धरले होते, परंतु युक्रेनने सुरुवातीचा आघात सहन केल्यानंतर ड्रोनच्या सहाय्याने रशियाच्या अनेक अत्याधुनिक विमानांना, जहाजांना आणि इतर महत्त्वाच्या साधनांना मोठे नुकसान पोहोचवले.
कीव्हमध्ये एका विशाल ड्रोन कारखान्याला भेट देण्याची संधी मिळाली. या कारखान्यात सुमारे 10 हजार कर्मचारी कार्यरत होते. त्यापैकी बहुतेक तरुण अभियंते होते. अवघ्या तीन वर्षांपूर्वी गॅरेजमधील छोट्या कार्यशाळेत काम करणारे हे अभियंते आता दर मिनिटाला अनेक ड्रोन तयार करणाऱ्या यंत्रणेचे संचालन करत आहेत. काही ड्रोन अल्प पल्ल्याचे असले तरी अनेक ड्रोन शेकडो किलोमीटर अंतर पार करून अचूक लक्ष्यभेद करू शकतात.
रशियाकडे अधिक सैनिक आणि शस्त्रास्त्रे असूनही युक्रेनने ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने तो समतोल साधला आहे. आज संपूर्ण जग युक्रेनच्या नावीन्यपूर्ण ड्रोन युद्धतंत्राचा अभ्यास करत आहे.
भारताने काय करावे?
या पार्श्वभूमीवर भारतीय धोरणकर्त्यांनी स्वतःला दोन प्रश्न विचारले पाहिजेत ः एक म्हणजे पाकिस्तान पुढील युद्धात वेगळ्या पद्धतीने कसा लढू शकतो? आणि दुसरा, भारताने आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आजपासून कोणती तयारी सुरू केली पाहिजे?
पाकिस्तानची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत सुमारे दहापट लहान आहे. रशियाच्या तुलनेत युक्रेनची जी आर्थिक स्थिती होती, साधारण तशीच पाकिस्तानची भारताच्या संदर्भात आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचे सैन्य काही महत्त्वाचे धडे घेत असेल. त्यामुळे भविष्यातील युद्धाची सुरुवात हजारो ड्रोनद्वारे श्रीनगर, राजकोट किंवा अगदी दिल्लीवर हल्ला करून होऊ शकते. पाकिस्तानची ‘विश्वसनीय नाकारता येण्याजोगी’ (Plausible Deniability) धोरणे लक्षात घेता लष्कर-ए-तोयबा किंवा जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांमार्फतही ड्रोन हल्ले घडवून आणले जाऊ शकतात. पाकिस्तान अशा संघर्षात एकटा नसेल. चीन आणि तुर्कस्तान हे दोन्ही देश पाकिस्तानला ड्रोन, तंत्रज्ञान आणि अन्य लष्करी साधनांचा पुरवठा करण्यास तयार असतील. भारताची वाढती आर्थिक, सामरिक आणि जागतिक शक्ती या देशांना अस्वस्थ करते. त्यामुळे ते पाकिस्तानचा वापर भारताविरुद्धच्या अप्रत्यक्ष युद्धासाठी करू शकतात.
भारतीय सैन्याने तातडीने मोठ्या प्रमाणावर ड्रोन स्वॉर्म (Drone Swarms) विकसित करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शत्रूच्या ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी प्रतिड्रोन (Counter-Drone) प्रणालीही विकसित करणे गरजेचे आहे. युक्रेनने ड्रोनविरोधी ड्रोन विकसित केले आहेत. भारताकडे अशा प्रणाली कितपत उपलब्ध आहेत? हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. युद्धभूमीवर शत्रूचे ड्रोन हस्तगत करून त्यांचे त्वरित ‘रिव्हर्स इंजिनीअरिंग’ करणारी संशोधन आणि विकास केंद्रे भारतात मोठ्या प्रमाणावर उभारली पाहिजेत.
चेतावणी प्रणाली!
आधुनिक युद्धात हिंसाचार केवळ सीमारेषेपुरता मर्यादित राहत नाही. शहरे, उद्योग, वीज केंद्रे आणि नागरिकही थेट लक्ष्य बनतात. युक्रेन आणि इस्रायलप्रमाणे भारतानेही संपूर्ण देशासाठी एक राष्ट्रीय हवाई हल्ला चेतावणी मोबाईल अॅप विकसित करणे आवश्यक आहे. या अॅपद्वारे नागरिकांना ड्रोन, क्षेपणास्त्र किंवा हवाई हल्ल्यांची वेळेवर माहिती देता येईल. तसेच जवळच्या सुरक्षित आश्रयस्थळांची माहिती, सुरक्षित मार्ग आणि आपत्कालीन सूचना देणे शक्य होईल. आज जर अशा प्रणालीची निर्मिती झाली नाही, तर भविष्यातील युद्धात हजारो भारतीय नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. युक्रेनने दाखवून दिले आहे की, तांत्रिक नावीन्य, नागरिकांचा सहभाग आणि प्रभावी संरक्षण व्यवस्था यांच्या सहाय्याने मोठ्या शत्रूचाही सामना करता येतो. भारताने मागील युद्धांच्या अनुभवांवरच अवलंबून राहण्याऐवजी युक्रेनने ज्या पद्धतीने ‘ड्रोन’ युद्धाद्वारे बलाढ्य रशियाला जेरीस आणले आहे, त्यावरून भविष्यातील युद्धाचे स्वरूप ओळखले पाहिजे. ड्रोन स्वॉर्म, प्रतिड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चेतावणी प्रणाली, नागरिक संरक्षण यंत्रणा आणि त्वरित तांत्रिक नवकल्पना या सर्व क्षेत्रांत आताच गुंतवणूक करणे आवश्यक आहे.





























































