Panama Earthquake – 7.7 आणि 6.6 तीव्रतेच्या दोन शक्तिशाली भूकंपाने पनामा हादरले; 9 देशांना त्सुनामीचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य अमेरिकेतील पनामा देशाला दोन शक्तिशाली भूकंपांचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी रात्री 7.7 तीव्रतेचा, तर शनिवारी पहाटे 6.6 तीव्रतेचा भूकंप झाला. या दोन्ही भूकंपांचे केंद्र जमिनीपासून सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होते. भूकंपामुळे देशाच्या मध्यवर्ती भागातील काही इमारतींचे नुकसान झाले असून रस्त्यांनाही तडे गेल्याचे वृत्त आहे. दरम्यान, तिबेटमध्येही शनिवारी सकाळी 3.7 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला.

अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेच्या माहितीनुसार, पनामाच्या दक्षिणेकडील भागाजवळ शक्तिशाली भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाचे धक्के दूरवर जाणवले. त्यानंतर अनेक आफ्टरशॉक्स म्हणजेच भूकंपानंतरचे धक्केही बसले. दुसऱ्या शक्तिशाली भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पनामाचे राष्ट्राध्यक्ष जोस राउल मुलिनो यांनी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. अशा प्रकारच्या आपत्तीसाठी कोणीही पूर्णपणे तयार नसते, असे त्यांनी म्हटले. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत प्रशासनाला कोणाचाही मृत्यू झाल्याची किंवा कोणी जखमी झाल्याची माहिती मिळाली नव्हती. मात्र, पुढील काही तासांत परिस्थिती बदलण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

नऊ देशांवर त्सुनामीचे सावट

भूकंपानंतर प्रशांत महासागरात त्सुनामीच्या धोकादायक लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेच्या त्सुनामी इशारा यंत्रणेने कोस्टा रिका, एल साल्वाडोर, पेरू, मेक्सिको, ग्वाटेमाला, पनामा, निकाराग्वा, कोलंबिया आणि इक्वेडोर या नऊ देशांना संभाव्य धोक्याचा इशारा दिला आहे. किनारपट्टीवर समुद्राच्या पाण्याची पातळी अचानक वाढू शकते आणि पाण्याचा प्रवाह वेगाने भूभागावर येऊ शकतो.

दरम्यान, तिबेटमध्ये शनिवारी सकाळी 3.7 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्रही जमिनीपासून सुमारे 10 किलोमीटर खोलीवर नोंदवण्यात आले.