पालिकेचा बेफिकीर कारभार, स्वातंत्र्यसंग्रामातील योद्ध्यांच्या बलिदानाचा विसर, मुंबईतील ‘1857 स्वातंत्र्ययुद्ध स्मृती स्मारक’ अंधारात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर उभारण्यात आलेल्या ‘1857 स्वातंत्र्ययुद्ध स्मृती स्मारका’च्या देखभालीकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. ऐतिहासिक आझाद मैदानाजवळ उभारलेल्या या स्मारकाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या स्मारकाच्या ठिकाणी विद्युत दिवाबत्ती बंद असल्यामुळे येथे रात्री पूर्णपणे अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. स्मारकाच्या फलकावरील अक्षरे निखळून पडली असून आवारात दररोज पालापाचोळय़ांचा खच साचत आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे ही स्थिती उद्भवल्याने इतिहासप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात 1857 चा उठाव हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अन्यायी धोरणाविरुद्धचा पहिला मोठा उद्रेक होता. याच 1857 च्या उठावामध्ये मुंबईत 15 ऑक्टोबर 1857 रोजी ब्रिटिश सरकारने मंगल गढिया व सय्यद हुसेन या दोघा शूर योद्ध्यांना मुंबईत एस्प्लनेड ग्रास (आताचे आझाद मैदान) येथे शेकडो लोकांच्या समोर क्रूरपणाने तोफेच्या तोंडी दिले होते. या दोन्ही शूर योद्ध्यांच्या बलिदानाची स्मृती जागती ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने उभारलेल्या ‘1857 स्वातंत्र्य युद्ध स्मृती स्मारका’चे अनावरण 21 ऑगस्ट 2009 रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. सौंदर्यीकरणावेळी या स्मारकाच्या आवारात कारंजे उभारले होते. ते कारंजे सद्यस्थितीत नष्ट झाले आहे. यावरून पालिकेला स्वातंत्र्यसंग्रामातील योद्ध्यांच्या बलिदानाचा विसर पडल्याची नाराजी इतिहास अभ्यासक महादेव (भाऊ) सावंत यांनी व्यक्त केली आहे.

महापौरांना पत्र देऊनही पालिका प्रशासन ढिम्मच

दुर्लक्षित स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी करीत महादेव (भाऊ) सावंत यांनी फेब्रुवारीमध्ये महापौर रितू तावडे व तत्कालीन प्रशासक भूषण गगराणी यांना पत्र लिहिले होते. त्याला सात महिन्यांचा अवधी उलटूनही स्मारक दुर्लक्षित आहे. 1857 स्वातंत्र्ययुद्ध स्मृती स्मारक या ऐतिहासिक स्मारकाबाबत मुंबई महापालिकेची एवढी उदासीनता का, असा सवाल उपस्थित होत आहे.

1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामात मुंबईत मंगल गढिया व सय्यद हुसेन या दोन योद्ध्यांना 15 ऑक्टोबर 1857 या दिवशी तोफेच्या तोंडी दिले. या योद्ध्यांया स्मृतिप्रीत्यर्थ महापालिकेने 21 ऑगस्ट 2009 रोजी उभारलेले ‘1857 स्वातंत्र्य युद्ध स्मृती स्मारक’ हे एकमेव स्मारक आहे. हे स्मारक म्हणजे 1857 स्वातंत्र्यसमरचा जाज्वल्य इतिहास जागविणारे प्रेरणास्थान आहे. येत्या 15 ऑक्टोबरला मंगल गढिया व सय्यद हुसेन यांच्या 169 व्या स्मृतीदिनानिमित्त महापौरांनी स्मारकास पुष्पचक्र अर्पण करावा.
– महादेव (भाऊ) सावंत, इतिहास अभ्यासक