
पंजाबमधील अमृतसर येथील श्री गुरु राम दास जी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ रविवारी रात्री उशिरा संशयास्पद ड्रोन दिसले. यानंतर धावपट्टीवरील कामकाज काही काळासाठी थांबवण्यात आले आणि अमृतसरला येणारी तीन विमाने वळवण्यात आली. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास विमानतळावजवळच्या राजसांसी गावात ड्रोन हालचालीची माहिती मिळाली.
टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, विमानतळ परिसर आणि आसपासच्या भागात आकाशात दोन ते तीन संशयास्पद ड्रोनसारख्या वस्तू उडताना दिसल्याने घबराट पसरली. सुरक्षेच्या कारणास्तव अमृतसरला येणारी विमाने वळवण्यात आली.
दिल्लीहून अमृतसरला येणारे एअर इंडियाचे विमान AI-855 दिल्लीला परत पाठवण्यात आले. मुंबईहून अमृतसरला येणारे इंडिगोचे विमान 6E-5028 चंदीगडला वळवण्यात आले, तर क्वालालंपूरहून अमृतसरला येणारे मलेशिया एअरलाइन्सचे विमान MH-118 दिल्लीला वळवण्यात आले.
रविवारी रात्री 9.30 च्या सुमारास विमानतळावर तैनात असलेल्या सीआयएसएफ जवानांना विमानतळाच्या आवारात आणि बाहेर हवेत दोन ते तीन संशयास्पद वस्तू उडताना दिसल्या. त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. परिस्थितीचा आढावा घेऊन आणि सुरक्षा तपासणी केल्यानंतर, रात्री सुमारे 10.15 वाजता हवाई सेवा पूर्ववत करण्यात आली.

























































