
जिबूतीहून येमेनला जाणारी बोट उलटल्याने किमान 15 मुलांसह 139 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत 84 जण बेपत्ता असून 82 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. आयओएमने दिलेल्या माहितीनुसार, 300 हून अधिक स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट जिबूतीमधील ओबोक शहराच्या उत्तरेकडील गुहेरेजवळ उलटली.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, दुर्घटनेची माहिती मिळताच तात्काळ शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. वाचलेल्या लोकांना आवश्यक वैद्यकीय मदत पुरवण्यात येत आहे. आमची पथके स्थानिक अधिकाऱ्यांसोबत मिळून प्रत्यक्ष मदत पुरवण्याचे काम करत आहेत, असे जिबूतीमधील आयओएमचे मिशन प्रमुख अलेक्झांद्र कोइसाक यांनी सांगितले.
अहवालानुसार, हे स्थलांतरित आखाती देशांमध्ये पोहोचण्यासाठी येमेनला प्रवास करत होते, तर दुसरीकडे 2022 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने झालेल्या युद्धविरामानंतर सौदी अरेबिया-समर्थित सरकारी सैन्य आणि इराण-समर्थित हौथी यांच्यातील लढाई मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे येमेनी नागरिक आपला देश सोडून पलायन करत आहेत.



























































