बिल्डरांनी बिघडवली नवी मुंबईची हवा, बांधकामे बंद करण्याचा आयुक्तांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिल्डरांनी नवी मुंबईतील हवा बिघडवली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक थेट 134 पर्यंत वाढल्यानंतर वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. बांधकाम साइटवर वायुप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या, पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरू नका, अशी ताकीद महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शहरातील बिल्डरांना दिली आहे. जर प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले तर बांधकाम साइट बंद करण्याचा इशाराही त्यांनी बिल्डरांना दिला आहे.

आगामी हिवाळी हंगामात हवेची गुणवत्ता ढासळू नये आणि बांधकामांच्या ठिकाणी होणारे वायुप्रदूषण रोखले जावे, यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आर्किटेक्ट्स, बिल्डर्स, सर्व्हेअर्स आणि संबंधित भागधारकांची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. याप्रसंगी आयुक्त म्हणाले की, वाढते प्रदूषण आणि ढासळती हवेची गुणवत्ता ही केवळ एक कायदेशीर बाब नसून नागरिकांच्या आरोग्याशी जोडलेली गंभीर समस्या आहे. हिवाळ्यात प्रामुख्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांना प्रदूषणाचा मोठा फटका बसतो. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी सामाजिक जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. या बैठकीला सहाय्यक संचालक नगररचना सोमनाथ केकाण, युवराज चव्हाण, कार्यकारी अभियंता राजेश पवार उपस्थित होते.

संयुक्त पाहणी मोहीम सुरू करणार

नगररचना विभाग आणि विभाग कार्यालयांचे अधिकारी यांच्यामार्फत संयुक्त पाहणी मोहीम सुरू करण्यात येत आहे. ज्या बांधकाम ठिकाणी नियमांचे उल्लंघन आढळेल, तिथे तत्काळ काम थांबवणे, मोठा आर्थिक दंड ठोकणे, अशी कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी सहाय्यक संचालक नगररचना सोमनाथ केकाण यांनी दिली.