
डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील बाजीप्रभू चौकातील केडीएमटी बस स्थानकाला अनधिकृत फेरीवाले, परीधारक आणि दुचाकी पार्किंगचा विळखा पडला आहे. बस थांब्याच्या रिसरात फूलविक्रेत्यांनी ठाण मांडल्याने प्रवाशांना उभे राहण्यासाठी आणि बसमध्ये चढ-उतार करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक दुर्लक्ष करत असल्याने प्रवासी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बाजीप्रभू चौकात चार ते पाच बस थांबे आहेत. या थांब्यातील आसन व्यवस्थेखाली अनेक फूलविक्रेत्यांनी आपले साहित्य ठेवले आहे. याच ठिकाणी बसून हार, गजरे आणि बुके तयार केले जातात. त्यामुळे प्रवाशांच्या वापरासाठी असलेल्या जागेचा व्यावसायिक कारणांसाठी वापर होत आहे. बस थांब्याच्या परिसरात काही ठिकाणी अनधिकृत टपऱ्या असल्याचा नारोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी विभागप्रमुख राजू नलावडे यांनी केला आहे. बस थांबा परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई का होत नाही, असा सवाल नलावडे यांनी केला आहे. फेरीवाले आणि परीधारकांकडून आर्थिक देवाणघेवाण होत असल्याने प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
बाजीप्रभू चौक बस थांब्याच्या जवळच फेरीवाले व टपरीवाल्यांमुळे महिला प्रवाशांना या ठिकाणी उभे राहणे सुरक्षित वाटत नाही. रात्रीचा वेळी तर तेथे व्यसनाधीन व्यक्तींचा वावर वाढलेला दिसतो. अनधिकृत पार्किंगमुळे बस थांबा परिसर धोकादायक ठरत आहे, अशी प्रतिक्रिया प्रवासी वर्षा महाडिक यांनी दिली.



























































