अनैतिक संबंधाचा संशय, डोंबिवलीत मुलाने केली ७० वर्षीय वडिलांची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पत्नीचे आपल्या वडिलांसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून ३२ वर्षीय मुलाने आपल्या ७० वर्षीय वडिलांची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील पिसवली परिसरात घडली.

शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळेपरिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुलगा आणि त्याचे ७० वर्षीय वडील हे दोघेही बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. दरम्यान आरोपीची पत्नी तिच्या गावी गेली होती. याच काळात पत्नीचे आपल्या वडिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीच्या मनात निर्माण झाला होता. या संशयातूनच आरोपीने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी बडील झोपलेले असताना आरोपीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात वडिलांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

धारदार शस्त्र जप्त

हत्येसाठी वापरण्यात आलेले धारदार शस्त्रही पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीच्या चारित्र्याबाबत मनात निर्माण झालेल्या संशयातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र हत्येमागील नेमकी कारणे आणि इतर बाबींचा मानपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.